मेहरूण तलाव परिसर बहरला : पक्षी निरीक्षणात ४७ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : निसर्गमित्रतर्फे रविवारी मेहरूण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शहरातील पक्षिमित्रांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पक्षी निरीक्षणादरम्यान मेहरूण तलावातील स्थानिक तसेच विदेशी, देशी स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन झाले. एकूण ४७ जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षिमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. दरम्यान, यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाल्यामुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत मेहरूण तलाव परिसरात अजूनही सैबेरीयाकडून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची प्रतीक्षा आहे. अनेक पक्षी तब्बल तीन हजार किमीचा प्रवास करून युरोप, हिमालयातून मेहरूण तलाव परिसरात दाखल झाले आहेत.
सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी मेहरूण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण सहलीचे निसर्गमित्रतर्फे रविवारी (दि. २७) सकाळी ७ ते ९.३० या वेळात आयोजित करण्यात आली होती. दरवर्षी निसर्गमित्रतर्फे पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात युरोप, सैबेरीया तसेच उत्तरेकडील हिमालय भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असते. यामुळे या भागातील पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून, दक्षिण भारतातील भागात स्थलांतरित होत असतात. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे पक्षी भारतात दाखल होऊन, सातपुडा, विंध्यसह सह्याद्रीलगतच्या जलाशयांवर काही महिने मुक्काम ठोकतात. त्यानंतर पुन्हा या पक्ष्यांचा परतीचा मार्ग सुरू होत असतो.
तब्बल तीन हजार किमीचा खडतर प्रवास
जिल्ह्यात युरोप, हिमालयाचा अतिथंड प्रदेशातून पक्षी दाखल झाले आहेत. तीन हजार किमीचा खडतर प्रवास करून हे पक्षी जिल्ह्यातील पाणवठ्यांवर दाखल झाले आहेत. यामध्ये थापट्या, श्वेतकंठी, पांढरा धोबी, करडा धोबी हे पक्षी युरोपातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत, तर हिमालयातील थंड भागातून तुतारी, धान वटवट्या हे पक्षीदेखील दाखल झाले आहे. दरम्यान, पाण्याची सर्वत्र उपलब्धता असल्याने अनेक पक्षी अजूनही मेहरूण तलाव परिसरात पोहोचले नाहीत. तसेच मेहरूण तलावात अजूनही चांगले पाणी आहे. त्यामुळे पाणथळ क्षेत्रावर येणाऱ्या पक्ष्यांची अजूनही प्रतीक्षा आहे.
पक्षी निरीक्षणादरम्यान आढळून आलेले पक्षी
राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांच्यासह पक्षिमित्रांनी केलेल्या निरीक्षणादरम्यान शिकरा, माळमुनिया, जांभळा सूर्यपक्षी, भारतीय दयाळ, वेडाराघू, सामान्य खंड्या, धीवर आणि पांढऱ्या गळ्याचा खंड्या, वारकरी, पाणकावळा, टिटवी, प्ल्ववा, वंचक अशा काही स्थानिक पक्ष्यांसोबत नदी सुरय, कमल पक्षी, स्वरल, जांभळी पाणकोंबडी, तुतारी, पांढरा धोबी, करडा धोबी, पांढर्या भुवईचा धोबी, पाणडुबी हे देशी-विदेशी स्थलांतरित मिळून ४६ जातीचे पक्षी आढळून आले. पक्षी अभ्यासक शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दुर्बिणीच्या साह्याने पक्षी दाखवून पक्ष्यांबद्दल मार्गदर्शन केले. या सहलीत संकल्प सोनवणे, जय सोनार, सोमिक सारडा, सलोल सारडा, कमलकिशोर मणियार, सागर इंगळे, गोकुळ इंगळे, नचिकेत वेरकर, विशेष रावेरकर, विलास बर्डे, यस भोळे, पंकज भोळे, मनोज चंद्रात्रय यांनी सहभाग घेतला.