आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१८ आशाबाबा नगरातील मिनाक्षी सजन भालेराव यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने व ३० हजार रुपये रोख असा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हे दागिने व रोख रक्कम मिनाक्षी भालेराव यांचे भाऊ व वहिणीचे होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशाबाबा नगरात मिनाक्षी भालेराव या मुलगा अभिलाष याच्यासह राहतात. भाऊ दीपक निकम हे बदलापूर येथे नोकरीला आहे. गेल्या महिन्यात दीपक कुटुंबियांसह मिनाक्षी यांच्याकडे आले होते. दिवाळीत पुन्हा येणार असल्याने त्यांनी पत्नीचे दीड लाखाचे दागिने व स्वत:चे ३० हजार रुपये रोख बहिणीकडेच ठेवले होते. ८ सप्टेंबर रोजी अभिलाष हा दीपक यांच्यासोबत मुंबई येथे गेला होता. त्यामुळे मिनाक्षी या एकट्याच घरी होत्या.
मेहुण्याकडे गेल्या अन् चोरी झालीदरम्यान, मिनाक्षी यांचे मेहुणे प्रकाश धुरंदर हे जिल्हा कारागृहात नोकरीला आहे. १४ ते १६ सप्टेंबरपर्यंत त्या दोन दिवसांसाठी मेव्हुणे धुरंदर यांच्याकडेच मुक्कामाला होत्या. त्याच काळात घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरातील ऐवज लांबविला.१६ सप्टेंबर रोजी हा प्रकार लक्षात आला. ही माहिती मिनाक्षी यांनी लागलीच बहिण व मेहुण्यांना सांगितली. दागिन्यांच्या पावत्या नसल्याने पोलिसांनी दोन दिवस गुन्हा दाखल केला नाही. सोमवारी पावत्या सादर केल्यानंतर गुन्हा दाखल झाला.
असा गेला मुद्देमाल ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे ३५ ग्रॅमच्या पाटल्या, ३० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅमचे ब्रेसलेट, ५२ हजार ५०० रुपयांच्या दोन साखळी व दोन पदक, १५ हजार रुपये किंमतीच्या १० ग्रॅमची अंगठी तर ३० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले.