लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पूर्वीपासून सामाजिक कार्याची आवड होतीच. त्यात पोलीस दलातून उपअधीक्षक पदावरून निवृत्त झाल्यानंतर आपल्या प्रशासकीय सेवेच्या अनुभवाचा ग्रामविकासासाठी लाभ व्हावा या हेतूने कानळदा ग्रामपंचायतीत निवडणूक लढविली. सर्वच सदस्यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू राहणार असल्याचे मत निवृत्त पोलीस उपअधीक्षक व कानळद्याचे सरपंच पुंडलिक संपकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : पोलीस दलात कोठे सेवा बजावली?
सपकाळे : पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, नाशिक, शहादा, तळोदा या ठिकाणी सेवा बजावली. शासकीय कर्तव्य बजावत असताना सामाजिक कामाची आवड असल्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात शाळा उभारली. त्यासोबतच एड्सग्रस्तांचा सामूहिक विवाह, तृतीय पंथीयांसाठी दफनभूमी या कामांसाठी नेहमी पाठपुरावा करून ते यशस्वी केले.
प्रश्न : राजकारणात येण्याचे नेमके कारण काय?
सपकाळे : वडील सरपंच असल्यामुळे काही प्रमाणात घरात राजकीय वारसा आहे. त्यात मे २०२० मध्ये उपअधीक्षक म्हणून निवृत्त झालो. त्या काळात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होता. आदिवासी भागासह कानळदा येथे कर्तव्य ग्रुपची स्थापना करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे काम करीत असताना नागरिकांचा आग्रह आणि गावासाठी काही करण्याची तळमळ असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतला. आम्ही तयार केलेल्या पॅनलमध्ये मिस्तरी काम करणाऱ्या मजुरापासून ते साधी गृहिणी यांचा समावेश आहे. मात्र प्रत्येकाला गावाच्या विकासाची तळमळ आहे.
प्रश्न : सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर कोणत्या कामांना प्राधान्य राहिल?
सपकाळे : सरपंच म्हणून काम करीत असताना सर्वसामान्य नागरिक हा माझ्यासाठी केंद्रबिंदू असणार आहे. नागरिकांना वेळेवर पाणी, नियमित साफसफाइ व दिवाबत्तीची व्यवस्था या गोष्टी आवश्यक आहे. या गोष्टींना प्राधान्य देत असताना गावातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधीचा संपूर्ण वापर यावर लक्ष केंद्रित करणार आहे. गावातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न राहणार आहे.
प्रश्न : समाजसेवा व राजकारण याला कुटुंबातून प्रतिसाद कसा?
सपकाळे : प्रशासकीय सेवेत असताना सामाजिक कार्याची आवड होतीच. या दरम्यान पत्नी मालूबाई व मुलगी गिरिष्मा यांचे सतत प्रोत्साहन होतेच. वडील यापूर्वी सरपंच असल्याने कुटुंबात राजकीय वारसा आहेच.
कोट
कानळदा ग्रा.पं.ची सदस्य संख्या १७ आहे. त्यात माझी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे मी कुण्या एका गटाचा सरपंच नसून १७ सदस्यांचा सरपंच आहे. गावातील विकास कामांना प्राधान्य राहणार आहे. त्यासोबतच शासकीय अधिकारी यांना गावात बोलवून विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- पुंडलिक सपकाळे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक व कानळदा सरपंच