लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर परेड करताना श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटत होते. तसेच त्यावेळचा अनुभव आयुष्यात समृद्ध करून देणारा ठरल्याचे परेडचे नेतृत्व करणाऱ्या समृद्धी संत हिने लोकमतकडे व्यक्त केले.
जळगावची एनसीसी कॅडेट समृद्धी संत हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या परेडमध्ये देशातील मुलींचे नेतृत्व केले. तिने जळगावचे नाव उंचावले. ती शनिवारी दिल्लीहून जळगावला परतली. त्यावेळी तीने आपले अनुभव लोकमतला सांगितले.
प्रश्न - प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर परेड करण्यासाठीची तयारी कशी केली होती. त्याची सुरूवात कधी केली.?
समृद्धी - पदवी शिक्षणासाठी मू.जे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर एनसीसीची परेड बघत होते. त्यावेळी त्याचे आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे एनसीसीला प्रवेश घेतला. त्याची नियमीत परेड होत असे. ही परेड करतानाच कधीतरी आपण दिल्लीला जाऊन राजपथवर परेड करावी, ही इच्छा मनात होती. त्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरूवातीला ड्रील करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे कधी हातात विटा घेऊन सराव केला. मी सुरूवातीपासूनच ड्रिलचा तासोनंतास सराव करत असे. त्यासाठी कमांडिग ऑफिसर प्रवीण धिमान, लेफ्टनंट वाय.एस. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रश्न - परेड कमांडर म्हणून निवडीचा प्रवास कसा होता. आणि परेडसाठी निवडीची प्रक्रिया कशी होती ?
समृद्धी - परेडसाठी विविध बटालियन मधून महाराष्ट्र स्तरावर सुरूवातीला ५६ जणांची निवड झाली. त्यातून दिल्लीला जाण्यासाठी २६ जणांची निवड करण्यात आली. दिल्लीला गेल्यावर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. मात्र तेथे बॅरकमध्ये देखील आम्ही सराव सुरू ठेवला. सुरूवातीचे आव्हान दिल्लीच्या थंडीवर मात करण्याचे आणि तेथे आजारी न पडण्याचे होते. ५ व ६ जानेवारीला देशभरातून आलेल्या १७० पैकी १०० जणांची परेडसाठी निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्राचे १० मुली आणि ११ मुले होती. नंतर २० जानेवारीपासून करीअप्पा मैदानात परेडचा सराव करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांत ज्यांची परेड चांगली होती. त्यांना कमांड द्यायला लावल्या. त्यातून तीन मुलींमध्ये माझी निवड करण्यात आली. २३ रोजी शेवटी परेड कमांडर म्हणून माझी निवड झाल्याचे जाहीर केले गेले.
प्रश्न - एनसीसी सोबतच तु भरतनाट्यम नृत्यही करते. त्याबद्दल काय सांगशील ?
समृद्धी - मी काही वेळ भरतनाट्यमचे शिक्षण आणि सराव देखील करत होते. त्यातून एक वेगळी उर्जा मिळते. लॉकडाऊनच्या काळात मी ऑनलाईन सराव देखील केला आहे. बऱ्याचदा एनसीसीची परेड झाली की घरी आल्यावर लगेच ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग असायचे. त्यामुळे तो देखील सराव होत होता.
कोट - भविष्यात संरक्षण क्षेत्रातच जाण्याचा विचार आहे. त्यासाठी एल.एल.बी.करुन जायचे की तृतीय वर्षानंतर लगेचच सीडीएसच्या परिक्षांद्वारे प्रयत्न करावे, यावर विचार सुरू आहे. त्याबाबत लवकरच कुटुंबासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ - समृद्धी संत