भुसावळ, जि.जळगाव : पारंपरिक अध्ययन-अध्यापनाला ज्ञानरचनावादी व कृतियुक्त अध्ययनाची जोड देणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी समजविण्यापेक्षा शिकविण्याची अनुभूती प्रत्येक शिक्षकाने घेतली पाहिजे, असे प्रतिपादन बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी केले.पुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे आयोजित नववी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील पाठावर आधारित वेबिनार शुभारंभप्रसंगी पहिलाच पाठ कस्टम ॲनिमेशन पीपीटीद्वारे डॉ.पाटील यांनी सादर केला.प्रारंभी समूहाचे मार्गदर्शक हनुमंत कुबडे यांनी उपक्रमाची भूमिका विशद केली. नवनाथ तोत्रे यांनी डॉ.जगदीश पाटील यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ.पाटील यांनी पाठाच्या सुरूवातीलाच नववी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकाचा आढावा घेऊन क्षमता क्षेत्रे सांगितली. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य व भाषाभ्यास या भाषाविषयक क्षमता पाठ्यपुस्तकातून विकसित व्हाव्यात. त्यासाठी विविध कृती तयार कराव्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांचा वापर अध्ययन-अध्यापनात करावा, असे सांगून त्यांनी लेखिका मीरा शिंदे यांचा 'नात्यांची घट्ट वीण' या पाठाचे अध्ययन कशा पद्धतीने करावे याचे तासिकानिहाय सादरीकरण केले. याबरोबरच त्यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी कपात करण्यात आलेले पाठ्यघटक, सर्व माध्यमांसाठी असलेली मराठीची पाठ्यपुस्तके, क्षमता क्षेत्रे, मूल्यमापनाच्या पायऱ्या, स्वमत, अभिव्यक्ती, अध्ययनाची निष्पत्ती आणि भाषाशिक्षकाची अनुभूती याविषयी सविस्तर माहिती दिली. वेबिनारमध्ये लेखिका डॉ.नीलिमा गुंडीदेखील सहभागी झाल्या होत्या.मराठी शिक्षकांसाठी असलेल्या या वेबिनारचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार शिक्षकांनी घेतला. सूत्रसंचालन दीपाली नागवडे यांनी, तर आभार अशोक तकटे व जिजाबा हासे यांनी मानले. पुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे आयोजित दहावी मराठी वेबिनारच्या प्रारंभीचा पाठही डॉ.पाटील यांनी सादर केला होता. त्यानंतर राज्यभरातून ३२ पाठांचे सादरीकरण झाले. आता नववी मराठी वेबिनारचा श्रीगणेशासुद्धा डॉ.जगदीश पाटील यांनी आपल्या पाठाद्वारे केला. यानंतर एकेक पाठाचे सादरीकरण रोज सायंकाळी पाच वाजता करण्यात येत आहे. दोन्ही उपक्रमात पहिलाच पाठ सादर करण्याचा मान संपूर्ण महाराष्ट्रातून डॉ.जगदीश पाटील यांना मिळाला. या ऑनलाईन उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
समजविण्यापेक्षा मिळावी शिकविण्याची अनुभूती-डॉ.जगदीश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:38 PM
पाठ समजविण्यापेक्षा शिकविण्याची अनुभूती मिळाली पाहिजे.
ठळक मुद्देपुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहाच्या वेबिनारचा श्रीगणेशाबालभारती मराठी भाषा मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांचे प्रतिपादनवेबिनारचा राज्यातील दोन हजार शिक्षकांनी घेतला लाभरोज सायंकाळी पाच वाजता पाठाचे होतेय सादरीकरण