यावल : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी यावल किसान प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या ग्राम उद्योगाच्या माध्यमातून हत्ती गवताची लागवड करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. याचा वापर जैविक इंधनासाठी केला जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी दिली.
येथील किसान प्रोड्युसर कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कडलक म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. उंबरठ्यावर असलेला हंगाम शेतकऱ्यांना हातचा गमवावा लागतो. यावल किसान प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतीतील वेस्टेज कचरा, तसेच लागवडीच्या माध्यमातून लावण्यात येणाऱ्या गवतावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना दोन पैसे प्राप्त होईल, ही बाब शेतकऱ्यांच्या विकासासाठी हितकारक ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून पडीक शेतीचा उपयोग करता येईल तसेच युवकांना रोजगार मिळेल. नैसर्गिक संकटातही या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तोंड देता येईल.
किसान प्रोड्युसर व मुंबईच्या एका संस्थेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतीमध्ये हत्ती गवताची लागवड करणार आहे. या गवताचा वापर सीएनजी जैवइंधनासाठी वापर केला जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार होणार असल्याने शेतीची सुपीकता, तसेच पडीक जमिनी लागवडीखाली येणार असल्याने आणि सेंद्रिय खताच्या वापरामुळे विविध जीवघेणे आजारावर प्रतिबंध येणार असल्याचाही दावा यावेळी करण्यात आला.
तालुक्यात १३ ग्राम उद्योगाची नोंदणी करण्यात आली आहे. यात फैजपूर न्हावी, आमोदा, हिंगोणा, सांगवी बुद्रुक, विरावली, मोहराळे, कोरपावली, दहिगाव, सावखेडा वड्री, सातोद आणि अंजाळे या गावांचा समावेश आहे.
या गावांमध्ये गवताची लागवड करण्यात येणार आहे. गवताचे बी हे कंपनीच्यावतीने पुरविण्यात येणार आहे. शेतातील ओला कचरा, पालापाचोळा, केळीची पाने, खोडे, आदींसह प्रकल्पाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या जैवइंधनात त्याचा वापर होणार आहे.
यावेळी चोपडा येथील उमेश पाटील, जामनेरचे जितेंद्र अहिरे, अमळनेरचे हेमंत पवार, तसेच स्टेट बँक व्यवस्थापक विजय टाले, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक चौधरी वासुदेव पाटील, येथील प्रकल्प शाखेचे अध्यक्ष ज्योत्स्ना दीपक पाटील, मुकुंद चौधरी, योगेश चौधरी, गोकुळ पाटील, पुष्पा पाटील, शुभम पाटील, जगन्नाथ कोल्हे नामदेव पाटील, नीलेश पाटील, प्रतीक वारके, आदी उपस्थित होते.