जळगाव बस स्थानक : गेल्या वर्षो संपली होती मुदत
जळगाव : जळगाव बस आगारात लावण्यात आलेल्या जाहिरात फलकाची मुदत गेल्या वर्षीच संपली असताना, आगार प्रशासनाने तब्बल वर्षभरानंतर हे फलक काढले आहेत. मात्र, आगार प्रशासनाने उशिरा फलक काढल्यामुळे महामंडळाचा वर्षभराचा महसूल बुडाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव आगारात जाहिरातीचे फलक लावण्यासाठी एका संस्थेला १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० पर्यंत ठेका देण्यात आला होता. मात्र, मुदत संपल्या नंतरही सबंधित संस्थेतर्फे बस स्थानकात प्रवेश द्वाराजवळच हा फलक लावलेलाच होता. तसेच आगार प्रशासनातर्फेही याबाबत कुठलीही कारवाई करण्यात येत नव्हती. या प्रकाराबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक सपकाळे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागवून, मुदत संपलेल्या फलकांबाबाबत व संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर लागलीच आगार प्रशासनाने जाहिरातीचा हा फलक हटवला आहे. दरम्यान, मुदत संपलेल्या फलकाची आगार प्रशासनाला कुठलीही माहिती नसल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.