लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ट्रान्सफार्मरमध्ये आवाज येत असल्याने महावितरणकडे तक्रार करूनही कुणीही न आल्याने अखेर बुधवारी दुपारी चार वाजता या ट्रान्सफार्मरचा मोठा स्फोट होऊन आग लागून चार क्षेत्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार एमआयडीसीत घडला. तब्बल वीस तास जी, व्ही, एस, एफ या सेक्टरचा वीजपुरवठा खंडित असल्याने अखेर या उद्योजकांनी गुरूवारी महावितरणचे कार्यालय गाठत मुख्य अभियंत्यांना जाब विचारला. अखेर दुपारी दोन वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उद्योजक परतले.
एमआयडीसीतील समीर चौधरी यांच्या जी १३ - २ या कंपनीच्या ट्रान्सफार्मरमध्ये सकाळी अकराच्या सुमारास त्यांना आवाज येत होते. याची त्यांनी तातडीने महावितरणकडे तक्रार केली. मात्र, वारंवार तक्रार करूनही महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. अखेर दुपारी चार वाजेच्या सुमारास या ट्रान्सफार्ममध्ये मोठा धमाका होऊन चार सेक्टरचा वीजपुरवठाच खंडित झाल्याचे समीर चौधरी यांनी सांगितले. या आधीही महिनाभरापूर्वी असाच प्रकार घडून तीन दिवस वीजपुरवठा खंडित होता. वारंवार असा पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या घटना आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे या भागातील ५० ते ६० उद्योजकांनी गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास एमआयडीतील मुख्य महावितरणचे कार्यालय गाठले व मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना जाब विचारला. जो पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा उद्योजकांनी घेतला होता. त्यानंतर अभियंता कुमठेकर यांनी काही कर्मचाऱ्यांना बोलावून दुरूस्तीसंदर्भात सूचना दिल्या. दीड तास ही चर्चा झाल्यानंतर दोन वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला. समीर चौधरी, समीर साने, तुषार पटेल, दिनेश राठी, अमित भारंबे, स्वप्निल चौधरी, मनिष अग्रवाल आदी उपस्थित होते.
महिनाभरात डीपींचे काम
एमआयडीसीमध्ये अनेक ठिकाणी डिपी उघड्या पडल्या असून अनेकांना फ्युज नाहीत, अशा स्थितीत या ठिकाणीही मोठा अपघात होण्याची भीती आहे. याबाबतही पावले उचलण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावर महिनाभरात नवीन डीपी बसविण्याची कार्यवाही करणार असल्याचे कुमठेकर यांनी उद्योजकांना सांगितले.
सुरक्षा साहित्य नाही
महावितरणचे कर्मचारी स्फोट झाल्याच्या काही वेळाने एमआयडीसीत पोहोचले मात्र, त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नव्हते, सुरक्षा कीट नव्हते, आम्ही कंपन्यांमधून काढून साहित्य दिले व मग नंतर आग विझविण्यात आल्याचे उद्योजकांनी सांगितले.