जळगाव : शेंदुर्णी ते पहुर रस्त्यावरील गोंदेगावाजवळ पेपरची रद्दी वाहून नेणा-या आयशरचे हेडलाईट फोडून चालकाला लुटणा-या टोळीचा एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. शुभम प्रकाश बारी (२०), रोशन दत्तात्रय बडगुजर (१९), गोरख बापू पाटील (१९) व अक्षय प्रकाश पाटील (२०, सर्व रा. शेंदुर्णी, ता.जामनेर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथून पेपरची रद्दी आयशर (एमएच.१०.एब्ल्यू.७३३६) मध्ये भरून चालक दशरथ बागुल हे बुधवारी सायंकाळी अकोलासाठी रवाना झाले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास शेंदुर्णी ते पहुर रस्त्यावरील गोंदेगावाजवळ जात असताना अचानक चार तरूण दोन दुचाकींवरून आयशरला ओव्हरटेक करित पुढे आले. काहीवेळानंतर रस्त्यावर दुचाकी आडवी लावून चौघांनी आयशर थांबविला. नंतर हेडलाईट फोडून चालकाजवळील मोबाईल व रोकड असा एकूण ८ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर प्रकरणी पहुर पोलिसात आयशर चालक दशरथ बागुल यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा झाला दरोडेखोरांचा पर्दाफाश
पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने सुध्दा तपासचक्र फिरविले. आयशरचे हेडलाईट फोडल्यामुळे एकाच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती चालकाने एलसीबीच्या पथकाला दिली. त्यामुळे जखमी दरोडेखोर हा जवळपासच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला असावा, असा संशय पथकाला बळावला. पथकातील पोलिसांनी लागलीच जामनेर, पहुर, पाचोरा परिसरातील लहान-मोठे दवाखान्यांमध्ये दरोडेखोरांची माहिती दिली. त्यात शेंदुर्णीतील एका डॉक्टराने काही वेळापूर्वी बोटाला दुखापत झालेला तरूण उपचार घेवून गेल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच सीसीटीव्ही तपासात शहानिशा करित आयशर चालकाला लुटणारे तेच दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी शुभम बारी, रोशन बडगुजर, गोरख पाटील व अक्षय पाटील या चौघांना शेंदुर्णीतून अटक करण्यात आली. चौकशीअंती चौघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, इंद्रिस पठाण आदींनी केली आहे.