लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुसुंबा येथील पती, पत्नीच्या खून प्रकरणात सामूहिक कट रचला म्हणून १२० ब हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. दरम्यान, अटकेतील तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा, ता. जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०) व अरुणाबाई गजानन वारंगणे (३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांनी मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून केला आहे. २१ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती.
अरुणाबाई हिने आशाबाईकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याशिवाय सुधाकर व देविदास हेदेखील कर्जबाजारी होते. त्यातून सुटका मिळण्यासाठी त्यांनी या खुनाचा कट रचला होता. त्यामुळे यात कट रचल्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. हा गुन्हा करताना संशयितांनी ज्या दोरीचा वापर केलेला आहे ती दोरी जप्त करणे बाकी आहे, त्याशिवाय दाम्पत्याचे दोन्ही मोबाइल चोरून जंगलात फेकले आहेत. मोबाइल जप्त करावयाचे असल्याचे सांगून पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी संशयितांना ९ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. न्या. साठे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.