जळगाव : आयात-निर्यातीसाठी कंटेनर स्वीकारण्यास नकार देणाऱ्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराने आता उद्योजकांकडून कंटेनर स्वीकारण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ३० मेपर्यंत कंटेनर पाठवावे, असे आगाराच्यावतीने उद्योजकांना कळविण्यात आले आहे. यापूर्वी १५ मेपर्यंत ही मुदत देण्यात आली होती.खान्देशातील आयात-निर्यातदारांना मोठा आधार असलेल्या भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाच्या आगारातून केळी, डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात केले जातात. सोबतच विदेशातून आयात होणाºया वस्तू मुंबई येथे न येता थेट जिल्ह्यात येतात. मात्र भारतीय कंटेनर महामंडळाने अचानक भुसावळ येथील हे आगार बंद करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेने जागेचे भाडे वाढविल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याचा जिल्ह्यातील उद्योगांना मोठा फटका बसत आहे.दहा दिवसांपूर्वी कंटेनर स्वीकारणे पूर्णपणे बंद केले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने ७ मे रोजी ‘भारतीय कंटेनर महामंडळाकडून माल स्वीकारण्यास नकार’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर महामंडळातर्फे उद्योजकांशी संपर्क साधून १५ मेपर्यंत कंटेनर पाठवावे, असे कळविण्यात आले. यामध्ये ८ मेपासून कंटेनर पाठविण्यास सुरुवात झाली. १५ मेपर्यंत कंटेनर स्वीकारले गेले. त्यानंतर आता पुन्हा महामंडळाच्या भुसावळ येथील आगाराच्यावतीने ३० मेपर्यंत कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार आगाराने उद्योजकांनाही कळविले.कंटेनर महामंडळाच्यावतीने ३० मेपर्यंत कंटेनर स्वीकारले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आता तेथे कंटेनर पाठविले जातील.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव
भारतीय कंटेनर महामंडळाकडून माल स्वीकारण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 1:00 PM