जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना २०१७ च्या अंमलबजावणीतील घोळ दोन वर्षांपासून सुरूच आहे. आता या योजनेंतर्गत तडजोडीची (ओटीएस) रक्कम भरण्यासाठीची मुदत ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.सतत चार वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडून थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्जही मिळणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने २८ जून २०१७ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या नावाने कर्जमाफी योजनेची घोषणा केली.कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान व ओटीएस अशा तीन वर्गवारीत ही कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ४४२ शेतकरी पात्र ठरले. त्यांची ९६६ कोटी ४० लाख ६१ हजार ९९९ रूपये इतकी रक्कम कर्जमाफीसाठी पात्र ठरली. मात्र या प्रक्रियेत आतापर्यंत २ लाख २७६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७७९ कोटी ६७ लाख ४३ हजार ३३२ रूपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अद्यापही ४३ हजार ११६ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची १८६ कोटी ७३ लाख १८हजार ६६७ रूपये एवढी रक्कम वर्ग होणे बाकी आहे.आता सरसकट शेतकरी कर्जमाफीचा घोळशेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली बदलत्या अटींमुळे घोळ घातला गेला. तो अजूनही मिटलेला नाही. आता सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची तयारी शासनाने चालविली असून त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली आहे. आधीची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. तर अनेकांना कर्जमाफी मिळूनही थकबाकीदार राहिल्याने त्यांना पिककर्जही मिळू शकलेले नाही. त्यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ३० जून २०१८ पर्यंत थकबाकीदार शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.विधानसभा निवडणुकांना जेमतेम अडीच महिन्यांचा कालावधी उरला असतानाही या कर्जमाफी योजनेचा घोळ सुरूच आहे. दिवसेंदिवस त्यात नवीन निर्णयाची भर पडत आहे.३१ आॅक्टोबरपर्यंत संधीकर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकºयांसाठी एकवेळ समझोता योजना (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकºयांना त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करण्यास मुदत वेळोवेळी वाढवत ३० जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक शेतकरी बाकी असल्याने या शेतकºयांना लाभ मिळावा यासाठी ओटीएस योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत १ जुलै ते ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
कर्जमाफी तडजोड रक्कम भरण्यास पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:35 AM