जळगाव : बीएचआर प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर मधुकर सोनाळकर व उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध दाखल खंडणी व फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन अर्जावर मंगळवारी विशेष तपास पथकाने त्यांचा अभिप्राय येथील न्यायालयात सादर केला. त्यावर न्यायालयाने दि. १० रोजी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केलेल्या अभिप्रायात ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या पुराव्यांनिशी गंभीर कारनाम्यांचा उलगडा केला आहे, तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या गौप्यस्फोटानंतर ॲड. चव्हाण यांनी आणखी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी, जळगाव) यांनी १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपास एसआयटी करत आहे. शुक्रवारी फिर्यादी सूरज झंवर यांचा जबाब नोंदविला. मंगळवारी न्या. जे. जे. मोहिते यांच्यासमोर ॲड. चव्हाण व सोनाळकर यांच्या जामीन अर्जावर कामकाज झाले. एसआयटीने सहा पानांचा अभिप्राय सादर करून दोघांच्या जामिनाला विरोध दर्शविला आहे.
जामिनाच्या हक्कापासून दूर ठेवलेसूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तेव्हा झंवर यांनी जामिनासाठी अर्ज केला तेव्हा श्री साई मार्केटिंग ॲण्ड ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. या व्यवसायात भागीदार असल्याचे ॲड. चव्हाण यांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही भागीदार असल्याचाबाबत पुरावा ॲड. चव्हाण यांनी सादर केलेला नाही. याचाच अर्थ ॲड. चव्हाण यांनी जामिनासाठी आधारहीन विरोध केला आणि अर्जदार जामिनाच्या हक्कापासून वंचित राहिले, असा अभिप्राय एसआयटीने दिला आहे.
गंभीर अभिप्राय- ६ मार्च २०२२ रोजी या गुन्ह्यातील आरोपी उदय पवार याने व्हॉटस्ॲपवर पाठवलेला संदेश व दिलेल्या मिस कॉल प्रिंटची भारतीय पुरावा कायदा कलम ६५ (ब)च्या प्रमाणपत्रासह सादर.- साक्षीदार तेजस मोरे याने फिर्यादीच्या मोबाइलवर स्क्रीनशॉटद्वारे काढून पाठविलेला ॲड. मोहत माहिमतुरा (पुणे) यांच्या फोटोची प्रिंट पुराव्याकामी सादर.- फिर्यादी व साक्षीदार झंवर यांनी मोबाइल फोनद्वारे सिग्नल ॲपच्या माध्यमातून तीनही आरोपींशी केलेल्या संभाषणाविषयी पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे तीनही आरोपींवर असलेल्या आरोपास पुष्टी मिळत आहे.