जळगाव : लहान मुलांच्या दृष्टीबाबत वेळीच उपाययोजना करण्यासह अंधत्वाचे प्रमाण कमी करता यावे यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावच्यावतीने (आयएमए) लहान मुलांसाठी दृष्टी तपासणी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात तक्ता उपलब्ध करून देण्यात आला असून पालकच मुलांची तपासणी करू शकणार आहे.सध्या भारतात अंधत्वाच्या कारणांमध्ये मोतीबिंदू नंतर दुसरे कारण म्हणजे लहान मुलांमध्ये असणारा दुर्लक्षित चष्म्याचा नंबर हे आहे. याचे प्रमाण १९.७ टक्के असून हे प्रमाण मोबाईल व संगणकाच्या अतिवापराने वाढत आहे. पालकांचे याकडे दुर्लक्ष होण्यासह आरोग्यसुविधा पुरविणाऱ्या शासकीय, अशासकीय यंत्रणेकडेदेखील अंधत्वाच्या या कारणावर मात करण्यासाठी ठोस असा आराखडा नाही.दुर्लक्षित चष्म्याचा नंबर यामुळे येणारे अंधत्व आपण पूर्णपणे वेळीच निदान आणि उपचार करून टाळू शकतो, असे आयएमएचे म्हणणे आहे. बºयाच रुग्णांमध्ये याचे निदान उशिरा होते. त्यामुळे डोळा आळशी होतो पुढे जाऊन तिरळेपणादेखील येतो. एकदा बाळाने वयाची ६-७ वर्ष पूर्ण केली आणि उशिरा त्याला चष्म्याचा नंबर आहे असे लक्षात आले तर दृष्टी पुन्हा चांगली होणे कठीण असते आणि त्यावर उपायदेखील नसतो. पुढे जाऊन ही मुले रेल्वे ,पोलीस, मिलिटरी या सारख्या विभागात चांगली दृष्टी सक्तीची असल्याने नोकरीस मुकतात. म्हणून वेळीच निदान आणि वेळीच उपचार होणे गरजेचे असल्याने आयएमए जळगावकडून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यासाठी सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी बालरोगतज्ज्ञांकडे हा प्रस्ताव मांडला असता सर्वांनी यासाठी तयारी दर्शविली.त्यानुसार १२ एप्रिलपासून शहरातील बालरोगतज्ज्ञांच्या वेटींग रूममध्ये डॉ. पाटील यांच्यासह आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, बालरोगतज्ज्ञ डॉ.अजय शास्त्री यांच्या उपस्थितीत दृष्टी तपासणीसाठी लागणारा तक्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालक स्वत: बाळाची दृष्टी एक डोळा झाकून तपासू शकतात व शंका वाटल्यास संबंधित बालरोगतज्ज्ञांच्या सल्ला घेऊ शकतात.लहान मुलांना दृष्टीदोष असू शकतो याबाबत पालकांमध्ये जागृती व्हावी व वेळीच उपचार करून या मुलांचे भविष्य दृष्टीदोषामुळे अंधारमय होऊन नये यासाठी हा उपक्रम आयएमएने सुरु केला आहे.- डॉ. धर्मेंद्र पाटील, सचिव, आयएमए जळगाव
आयएमएतर्फे दृष्टी तपासणी उपक्रम, पालकच करु शकतील तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:55 AM