भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता डाक विभागाने नागरिकांना कोणत्याही बँकेतून पैसे काढून देण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. डाक विभागाने मागील वर्षीही नागरिकांना जवळपास १२ कोटी रुपयांचे वाटप केले होते. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १४ रोजी तातडीची बैठक घेत भारतीय डाक विभागाने कोविड-१९ च्या काळात शहरी भागासह ग्रामिण भागातील नागरिकांना आवश्यकतेनुसार तब्बल २६ हजार ग्राहकांच्या कोणत्याही बँक खात्यात असलेली रक्कम ग्राहकांना घरपोप उपलब्ध करुन दिली होती. ही रक्कम तब्बल १२ कोटी ११ लाख रुपयांच्या रकमेची वाटप केली होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांनी डाक विभामाच्या कामाची प्रशंसा केली. तसेच सध्या सुरू असलेल्या संचारबंदीतही डाक विभागाकडून घरपोच उत्कृष्ट सेवेची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय डाक विभागाच्या ग्राहकांसोबत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यामार्फत कुठल्याही शेड्युल बँकेच्या ग्राहकांना घरपोच पैसे काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकांनी डाक विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांचा जवळील पोस्ट कार्यालय तसेच पोस्टमनमार्फत घरपोच पैसे मिळविण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ विभागाचे डाक अधीक्षक यु. पी. दुसाने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२५८२-२२२४२४ या क्रमांकावर संपर्क करावा. आयपीपीबीच्या अधिक माहितीसाठी www.ippbonline.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करणयात आले आहे. निशुल्क घरपोच पैसे मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बाहेर निघण्यास बंदी असल्यामुळे अनेक नागरिक व बँक ग्राहकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे भुसावळ विभागातील सर्व उपडाकघरे, शाखा डाकघरे व येथिल प्रधान डाकघर वविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला होता. विभागांतर्गत येणाऱ्या भुसावळ, जामनेर, यावल, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा व बोदवड अशा सात तालुक्यातील पोस्टमनच्या सहाय्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ग्राहकांना फक्त आधार क्रमांक व मोबाईलच्या (एईपीएसच्या) आधारे ग्राहकांना कोणत्याही बँक खात्यातून निशुल्क घरपेाच पैसे उपलब्ध करून दिले आहेत.
संचारबंदीत बँकेतून पैसे काढण्याची डाक विभागाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 1:55 PM
संचारबंदीमध्ये बँकेतून पैसे काढण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
ठळक मुद्दे ग्राहकांना मिळणार दिलासाघरपोच मिळणार रक्कम