खडसे समर्थकांसह इतर पदाधिकारी झाले सक्रिय : काही पदाधिकारी मुंबईला गेल्याचीही चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीत फेरबदलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशानंतरदेखील जिल्हा राष्ट्रवादीत फार मोठे फेरबदल पहावयास मिळाले नव्हते. मात्र, आता राष्ट्रवादीतील इतर पदाधिकारी यांची नाराजी सोबत घेऊन राष्ट्रवादी महानगरमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्यात पेट्रोल दरवाढीच्या आंदोलनावरून मतभेद असल्याचे उघड झाल्यानंतर, आता महानगरमधील इतर पदाधिकारी व काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले पदाधिकारीदेखील आता सक्रिय झाले असून, इतर पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आता पदांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यात विनोद देशमुख व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यातदेखील अनेक वाद निर्माण झाले आहेत. तसेच सोशल मीडियावरदेखील राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीची परिस्थिती बेताची असताना महानगर राष्ट्रवादीमध्ये वाढलेल्या कलहामुळे राष्ट्रवादीची अधोगतीच जास्त होण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष घेणार आढावा
राष्ट्रवादी झालेल्या वादामुळे राज्य प्रदेशाध्यक्षांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, या परिस्थितीचा संपूर्ण आढावा जयंत पाटील घेणार आहेत. यासह पुढील काही महिन्यांमध्ये होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत प्रदेशाध्यक्ष आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.