जामनेर : एकनाथराव खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहीजे अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जामनेर येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, या कार्यक्रमाला खडसे यांनी अपेक्षेप्रमाणे गैरहजर राहिले तर खासदार सुनबाई व समर्थकांनी मात्र उपस्थिती दिली.जी.एम.फाऊंडेशनच्या सहकार्यातून स्थापन झालेल्या ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशिलीटी हॉस्पिटलचे उद्घाटन फडणवीस यांच्याहस्ते झाले. तत्पूर्वी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.खडसे यांच्याशी दिवसभरात कोणतीही चर्चा झाली नाही, असेही फडणवीस म्हणाले.दरम्यान, जामनेरच्या कार्यक्रमाचे खडसे यांना निमंत्रण देण्यात आले होते. ते या कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणेच गैरहजर राहिले. तर त्यांच्या सुनबाई आणि खासदार रक्षा खडसे आणि इतर समर्थकांनी कार्यक्रमाला आवार्जून उपस्थिती दिली.दुसरीकडे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या उपस्थित जामनेरात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाली तर मुक्ताईनगर येथील निवासस्थानीही खडसे यांनी गुप्त बैठक घेतली. यात नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याची माहिती मिळाली.मुक्ताईनगर येथील पाणी योजनेसंदर्भात नगराध्यक्ष नजमा तडवी यांनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.