मुंबई - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे कुठेही दिसले नाहीत. तिकडे खडसे मात्र सोमवारीच मुंबईला पोहोचले होते. मात्र, या भेटीवेळी एकनाथ खडसेंसोबतही फडणवीस यांचं बोलणं झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता फडणवीस दौऱ्यावर आले असता मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात होते. या भेटीबाबत रक्षा खडसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. घरातील कमळातील घड्याळाबद्दलही त्यांनी मौन सोडलं.
'फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते असं नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळेच, नाथाभाऊंचंही त्यांच्याशी बोलणं झालं,' असं रक्षा खडसे म्हणाल्या. 'मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणं, चहापाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या,' असं त्यांनी सांगितलं. कोथलीतील घरात असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारलं असता, 'नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हे खरं आहे. पण, ते पूर्वी भाजपमध्ये होते, तेव्हापासूनच्या या वस्तू आहेत.', असं स्पष्टीकरण रक्षा खडसेंनी दिलं आहे.
इतर कुठलेही कारण नव्हते - फडणवीस
फडणवीस व खडसे यांच्यात ते एकाच पक्षात असतानाही पटले नाही. तर खडसे यांनी त्यांच्यामुळेच भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे सांगितले गेले आहे. अशात फडणवीस हे खडसे यांच्या निवासस्थानी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, खासदार रक्षा खडसे या भाजपच्या असून त्यांनी चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आपण तेथे गेलो होतो. यात इतर कुठलेही कारण नव्हते, असे फडणवीस यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.