जळगाव : ज्या कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली आहे, त्यांच्याकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याविषयी यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. तसेच गृह विलगीकरणात नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
सौम्य अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह असावे असे निकष ठरविण्यात आले आहे. मात्र अनेक जण याचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्याने या विषयी जिल्हाधिकारी राऊत यांनी या विषयी कडक निर्देश जारी केले. यासंदर्भात शुक्रवारी संध्याकाळी आदेश काढून नियमांचे काटेकोर पालन करण्याविषयी यंत्रणांना निर्देश दिले.
प्राधान्याने सीसीसीमध्ये दाखल करा
सौम्य अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना प्राधान्याने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. गृह विलगीकरणासाठी अपवादात्मक स्थितीत परवानगी द्यावे, असेही आदेशात नमूद केले आहे.
ज्येष्ठांना परवानगी नाकारली
ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांना तसेच इतर गंभीर आजार असलेल्यांनाही गृह विलगीकरणाची देऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय गृह विलगीकरणासाठी केवळ एक कुटुंब असावे, स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह असावे, घरी काळजी घेणारी निगेटिव्ह व्यक्ती हवी, खासगी डॉक्टरांची, वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी हवी, प्रभाग अधिकाऱ्यांची अर्जावर स्वाक्षरी असावी, त्यांच्याकडून रुग्ण राहत असलेल्या ठिकाणाची शहानिशा केलेली असावी, रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे मॉनिटरिंग करण्यासाठी एक आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी यावा, असे काही नियम असून त्याची अंमलबजावणी होते की नाही, यावर यंत्रणांनी लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.