फैजपूर: उत्तर प्रदेश मधील आजमगड येथे महसूल विभागात नोकरीत असलेले व गेल्या तीन वषार्पासून भ्रांत हरपल्याने घर सोडून निघून गेलेले रामकुमार हेमराज यादव (वय५७) यांना फैजपूर पोलिसांनी शहरातील शेख खलील शेख करीम शेख, नासिर शेख यांच्या मदतीने नातेवाईकांच्या स्वाधीन करून माणुसकीचे दर्शन घडविले.राम कुमार यादव हे गेल्या तीन वषार्पासून भ्रांत हरपल्याने घरातून निघून गेले होते तर चार महिन्यापासून ते शहरातच फिरत होते या दरम्यान शेख बांधवांनी त्याची वेळोवेळी जेवणाची व्यवस्था केली व विश्वासात घेत त्याला त्याचे नाव गाव विचारले त्यानंतर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत सपोनि प्रकाश वानखेड, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हेकॉ इक्बाल सय्यद, अमजद पठाण, उमेश चौधरी यांनी त्याची सखोल चौकशी करीत उत्तर प्रदेशातील बभणगाव सरपंचाचा मोबाईल नंबर प्राप्त करून सोशल मीडियाद्वारे त्याचे फोटो पाठविल्याने नातेवाईकांना त्याची ओळख पटली. सोमवारी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांचे नातेवाईक श्रावण यादव यांच्या स्वाधीन राजकुमार यादव यांना करण्यात आले.
घर सोडलेल्या उत्तर प्रदेशातील इसमाला फैजपूर पोलिसांनी केले नातेवाइकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 10:11 PM