लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फेसबुक, इन्स्टाग्राम यासह इतर सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून फसवणुकीचे प्रकार अलीकडे खूपच वाढत चालले आहेत. बनावट प्रोफाइल तयार करून संबंधित व्यक्तीच्या प्रोफाइलसोबत जोडलेल्या मित्र-मैत्रिणींच्या अकाउंटवर मेसेज पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी असेल किंवा फेसबुकसारख्या माध्यमातून ऑनलाईन सेक्स व त्यानंतर ब्लॅकमेलिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात अशा प्रसंगांना उच्चशिक्षित व उच्चभ्रू लोकही याला बळी पडलेले आहेत.
ऑनलाइन फसवणूक असो किंवा अन्य प्रकारे सोशल मीडियावरील छळ असो, अशा माहिती तंत्रज्ञानाच्या गुन्ह्यांमधील तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे हे पोलिसांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेत सायबर गुन्हेगारांपासून सावध राहणे गरजेचे आहे. तरुण, तरुणींनी अशा फेक अकाऊंटच्या प्रोफाईलपासून चार हात लांब राहणे कधीही फायद्याचेच आहे. अनेक तरुण, तरुणी अशा प्रोफाईलचे अश्लील तसेच मादक स्वरूपाची फोटो बघून आकर्षित होतात अन् त्यांना मोह आवरेनासा होतो. या मोहापायी फसव्या अकाऊंटच्या प्रोफाईलवर भेट देत तरुण-तरुणींकडून ते तपासले जातात अन् अलगद ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. जेव्हा आपल्याला फसव्या अकाऊंटधारकाकडून त्रास होऊ लागला, हे लक्षात येते, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटते. जळगाव जिल्ह्यात एका शिक्षण संस्थेचा प्राचार्य, वकील, अमळनेरातील एक डॉक्टर असे प्रतिष्ठित नागरिक याला बळी पडलेले आहेत. ही सर्व प्रकरणे सायबर पोलिसांकडे आलेली आहेत.
कोरोना काळात तक्रारींत वाढ :
कोरोना काळात अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यात अश्लील व्हिडिओच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याशिवाय बनावट प्रोफाइल तयार करून संबंधित व्यक्तीच्या प्रोफाइलसोबत जोडलेल्या मित्र-मैत्रिणींच्या अकाऊंटवर मेसेज पाठवून पैशांची मागणी संकटकाळात मदत म्हणून केली जाते. यात जळगावात तर पोलीस अधिकाऱ्यांचीच बनावट अकाऊंट तयार झालेली आहेत. सायबर गुन्हेगारांकडून फेसबुकवरील बहुतांश अकाऊंट हॅक करतात. सायबर गुन्हेगाराकडून असा प्रताप कोरोनाच्या काळात वाढल्याचे समोर आल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी सांगितले.
पोलिसांसाठी वेगळे पाेर्टल नाही :
बनावट अकाऊंटचा पर्दाफाश करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे वेगळे असे कुठलेही पोर्टल अद्याप तरी अस्तित्वात नाही. बनावट अकाऊंटच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाशी संबंधित मुख्यालयाकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठविली जाते. संबंधित प्रोफाइलधारकाचे आधारकार्डची स्कॅन कॉपी तसेच मुख्य छायाचित्र वैयक्तिक माहिती पाठवून ती खरी असल्याचे सांगितले जाते. यानंतर फेसबुकडून ती पडताळणी करून महिनाभराच्या कालावधीत बनावट अकाऊंट बंद केले जाते.
एका मिनिटात खाते बंद करता येते :
बनावट खाते एका मिनिटात बंद करता येते. सायबर पोलिसांकडे जाऊन ते हे खाते बंद करतात. जळगावला सायबर पोलिसांनी प्रत्यक्ष अनेकांची खाते बंद केली आहेत. केंद्र सरकारकडून बनावट खाते सात दिवसांत बंद केले जाते असा दावा केला जात असला तरीदेखील वस्तुस्थिती वेगळी आहे. एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे व प्रकरण मोठे असेल तर सायबर पोलिसांकडून ई-मेल पाठविला जातो. त्याची इत्यंभूत माहिती पोलिसांना महिनाभरात मिळते. माहिती तंत्रज्ञानाचे काही नियम असले तरीदेखील अद्याप पुरेशी प्रभावी प्रगत यंत्रणा सायबर पोलिसांकडे उपलब्ध होऊ न शकल्याने सायबर गुन्हेगारी नियंत्रणात आणताना पोलिसांचीही दमछाक होत आहे.
तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर :
१) बनावट अकाऊंट दिसले तर सर्वात आधी फेसबुकला कळवावे व ते अकाऊंट तत्काळ बंद करावे. कोणत्याही मोहात न पडता अशाप्रकारच्या प्रोफाइलवर भेट देणे टाळावे.
२) स्वत:च्या नावाचे वेगळे बनावट अकाऊंट तयार झाल्याचे लक्षात आले तर सर्वप्रथम त्या प्रोफाईलची यूआरएल कॉपी करून घेत आपल्या मूळ अकाऊंटच्या प्रोफाइलवरून संदेश वॉलद्वारे याबाबत आपल्या सोशल मीडियाच्या मित्र परिवाराला अवगत करणारे आवाहन प्रसिद्ध करावे, यामध्ये ही यूआरएल पेस्ट करून याद्वारे प्राप्त झालेल्या संदेशांना कुठलाही प्रतिसाद देऊन नये.
३) बनावट यूआरएलची माहिती सायबर पोलीस ठाणे किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून द्यावी. जेणेकरून फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम यासारख्या सोशल माध्यमांना ती कळविणे सोपे होईल.
४) बनावट प्रोफाईलसंदर्भात आपल्या मित्र परिवाराला अधिकाधिक संख्येने फेसबुककडे ‘रिपोर्ट’ करण्याचे आवाहन करावे. जितके जास्त रिपोर्ट ऑनलाइन संबंधित प्रोफाइलबाबत नोंदविले जातील तेवढे लवकर ते खाते बंद होते.
सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी
वर्ष- २०१९- तक्रारी - ९५
वर्ष- २०२०- तक्रारी- ११२
वर्ष-२०२१- तक्रारी-१७८