जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) ने रस्ते व पुलाचे बांधकामसंदर्भात निविदा काढुन मागविलेले टेंडर मिळविण्यासाठी सेहगल स्टील इंडस्ट्रीज हरिद्वार या नावाचे खोटी बिले व इनव्हाईस स्वत: बनवून ठेकेदार विनय बढे यांनी ५४ लाख ९३ हजार ४७ रूपयांची फसवणूक केल्याच्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात बुधवारी जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने जळगावसार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता व सध्या नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पदावर असलेले संजय नारायण नारखेडे यांना नाशिक येथून अटक केली आहे.बांधकाम विभागाच्या या बनावट ईमेल व खोटी बिले प्रकरणात सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगावचे कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार विनय बढे यांच्याविरूध्द भाग ५ गुरनं १८९/१८ भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४७०, ४७१ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड ) प्रमाणे जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयात हजर करणारदरम्यान, ताब्यात घेतलेल्या कार्यकारी अभियंता नारखेडे यांना गुरूवारी जिल्हापेठ पोलीस न्यायालयात हजर करून पोलीस रिमांड घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले. या प्रकरणात फिर्यादीने सांगितलेल्या काही कागदपत्रांची पोलिसांना नारखेडे यांच्याकडून माहिती घ्यावयाची आहे. तसेच हे प्रकरण त्यांच्या कार्यकाळातील असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविलेया गुन्ह्याच्या तपासासाठी यापूर्वी बांधकाम विभागातील तीन अधिकाºयांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. बढे यांनी सेहगल स्टील इंडस्ट्रीज हरिद्वार यांचे नावाचे बनावट ई मेल आयडी करून सदर टेंडर भरून काम मिळविले होते. ठेकेदार यांनी बनावट दस्ताऐवज बनविले असताना कार्यालयातील संबंधीतांची खातरजमा करण्याची जबाबदारी होती. परंतु गंभीर अशा स्वरूपाच्या घटनेकडे फारसे गांभीर्याने बघितले गेले नाही. असे तपासातून आता समोर आले आहे.बांधकाम विभागात खळबळया प्रकरणाशी संबंधीत नाशिक जिल्हा परिषदेतील इमारत व दळणवळण विभाग- २ चे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज सायंकाळी जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी तसेच कॉन्स्टेबल महेंद्र बागुल यांचे पथक नाशिक येथे गेले होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. कार्यकारी अभियंता नारखेडे यांच्या अटकेने बांधकाम विभागात खळबळ उडाली असून याप्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बनावट ई मेल व बिल प्रकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 1:02 PM