जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील पुलाच्या बांधकामाच्या ५५ लाखांच्या कामाच्या ई-निविदेत अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने खोट्या दस्तऐवजांचा वापर करून भ्रष्टाचार केल्याचा प्रकार भ्रष्टाचार निर्मूलन समितीत प्राप्त तक्रारीच्या चौकशीअंती उघड झाला आहे.या प्रकरणात मक्तेदाराने हरिद्वार येथील कंपनीकडून मशिनरी खरेदी केल्याबाबतची खोटीच बिले जोडली असून ती खरी असल्याची पडताळणी सुरू झाल्यावर कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांच्याच कार्यालयातून सदर कंपनीच्या नावाचा बनावट ई-मेल आय-डी तयार करून तेथून कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांना बिले खरी असल्याचा बनावट ई-मेल पाठविल्याचे सायबर सेलने केलेल्या तपासात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पुढील बैठकीत कारवाईबाबतचा निर्णय होणार आहे.सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगाव यांनी २२ जुलै २०१६ रोजी ४१ कामांची आॅनलाईन निविदा सूचना प्रसिद्ध केली. निविदा भरण्याची अंतिम मुदत २६ आॅगस्ट २०१६ ही होती. त्या ४१ कामांपैकी अनुक्रमांक १९ वर बोदवड तालुक्यात राज्य मार्ग क्र.६ ते तळवेल -जुनोने दिगर-आमदगाव-रूईखेडा रस्ता प्रजिमा-२५ वर १९/९३० व २०/८७३ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्याच्या ५४.९३ लाखांच्या कामाचा समावेश होता. मात्र यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मक्तेदार यांनी हातमिळवणी करून बनावट कागदपत्र सादर करून मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याची व भ्रष्टाचार केल्याची तक्रार विजयकुमार नामदेव काकडे मु.चिखली पो.घोडसगाव ता. मुक्ताईनगर यांनी केली होती. ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार निर्मूलन समितीपुढे ठेवण्यात आली. त्यात उत्तरप्रदेशातील हरिद्वार येथील सहगल इंडस्ट्रीजकडून मशिनरी खरेदी केल्याची खोटी बिले जोडली असून त्याबाबत खोटा ई-मेल पाठविल्याचीही तक्रार होती. त्यावर चर्चा होऊन पोलिसांना तसेच त्रयस्थ अधिकारी म्हणून मूळचे सार्वजनिक बांधकाम विभागाचेच अभियंता असलेले परंतू मनपात प्रतिनियुक्तीवर असलेले शहर अभियंता बी.डी. दाभाडे यांना चौकशीचे आदेश दिले होते.काय आहे घोळ?निविदेत पात्र ठरलेल्या अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स, जळगाव, भालचंद्र तळेले व विनय सोनू बढे हे पात्र ठरले. त्या पैकी विनय बढे यांनी निविदेसोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सेहगल स्टील इंडस्ट्रीज, हरिद्वार, उत्तरप्रदेश यांच्याकडून १९ फेब्रुवारी २०१६ रोजी ५ हजार लिटरचे वॉटर टँकर, स्लम्प कोन, क्यूब मोल्ड, चाळण्या, मेकॅनिकल अॅसफाल्ट स्पेअर युनिट खरेदी केल्याचे तीन ईनव्हाईसेस जोडले होते. ते खोटे असल्याची तक्रार असल्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये सेहगल स्टील इंडस्ट्रीज, हरिद्वार यांना रजिस्टर पोस्टाने कळविले. त्याला सहेगल स्टिल इंडस्ट्रीजने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव यांना सदरचे इनव्हाईसेस आम्ही दिलेले नाहीत, असे ई-मेलने कळविले. मात्र तो ई-मेल दडवून ठेवत कार्यकारी अभियंता (उत्तर विभाग) यांच्या कार्यालयातच संगणकावर कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल अकाऊंट तयार करून इनव्हाईस दिले असल्याचा बनावट मेल कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात आला. तसेच मे. अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स यांनीही अॅग्रीमेंटधारक उज्ज्वलकुमार नामदेव बोरसे यांच्या नावाचे सेहगल स्टील इंडस्ट्रीजचेच १९ फेब्रुवारी रोजीचेच दोन ईनव्हाईस जोडले असल्याने त्यावरही कारवाई होण्याची शिफारस चौकशी अधिकारी दाभाडे यांनीकेलीआहे.सायबरसेलने घेतली माहितीपोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी याहू व गुगलवरील दोन इमेल अॅड्रेसवरून सार्वजनिक बांधकाम विभागाला सहगल इंडस्ट्रीजकडून दोन वेगवेगळे मत व्यक्त करणारे ई-मेल आलेले असल्याने स्वत: गुगल कॉर्पोरेशन व याहू वेब सर्व्हीसेस प्रा.लि. यांना पत्र पाठवून कार्यकारी अभियंता उत्तर विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्या ई-मेलवर सहगल इंडस्ट्रीजच्या दोन वेगवेगळ्या ई-मेलबाबत ते कोणी व केव्हा तयार केले? त्या संगणकाचा आय-पी अॅड्रेस, तसेच ज्या संगणकावरून ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सायं ६.१२ वाजेचा तसेच १० डिसेंबर २०१६ रोजी ई-मेल प्राप्त झाला आहे. तो पाठविणाºया संगणकाचा आय-पी अॅड्रेस कोणता आहे? याची माहिती मागविली होती.कार्यकारी अभियंत्यांच्याच कार्यालयातून बनावट ई-मेलयाहू व गुगल कडून मिळालेल्या माहितीनंतर याहू वरील ई-मेल खरा असून कंपनीने त्यातच इनव्हाईसेस दिलेले नसल्याचे कळविले होते. मात्र तो मेल दडवून ठेवत कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांच्याच कार्यालयातील संगणकावरून गुगलवर कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल अकाऊंट ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ -४८ वाजता तयार करण्यात आले. तसेच बनावट मेल १० डिसेंबर २०१६ रोजी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी आला असल्याचे स्पष्ट झाले.वर्कडन सर्टिफिकेटही बनावटमे. अनुप्रेम कन्स्ट्रक्शन्स यांनी कामाच्या निविदेबाबत कार्यकारी अभियंता लघुसिंचन (मृदसंधारण) विभाग जळगाव यांच्याकडील १६ मे २०१६ रोजीचे वर्कडन सर्टिफिकेट जोडले असून त्याची सत्यता पडताळण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम (उत्तर विभाग) यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांना कळविले. तक्रारदाराने कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांच्याकडून माहिती घेतली असता अनुप्रेम कन्स्ट्रक्शन जळगाव यांना वर्कडन सर्टिफिकेट दिलेले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विनय सोनू बढे व अनुप्रेम कन्स्ट्रक्शन जळगाव यांनी खोटी कागदपत्रे निविदेसोबत जोडली असून पोलीस विभागाच्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यास हरकत नसल्याची शिफारस शहर अभियंता दाभाडे यांनी अहवालात केली आहे.
जळगावात सा.बां.विभाग व मक्तेदारांचा संगनमताने भ्रष्टाचार, कार्यकारी अभियंत्यांना पाठविला बनावट ई-मेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:13 PM
चौकशी अहवालात ठपका
ठळक मुद्देकार्यालयाचा केला वापरवर्कडन सर्टिफिकेटही बनावट