सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रतिकारशक्तीवाढीसाठी विविध आहार घेण्यासह वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यात अंडी खाण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे अंड्यांना मागणी वाढली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात कोंबडीच्या अंड्यांचे भाव तेजीत आले असून याचा गैरफायदा घेत बनावट अंडीदेखील बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत.
याचा प्रत्यय वडली येथील डॉ. रमेश पाटील यांना आला. त्यांनी अंड्यांचा एक ट्रे विकत घेतला असता त्यात एक बनावट अंडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे अंडी खाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बनावट अंडी बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
कसे असते बनावट अंडे
बनावट अंडे हे अस्सल अंड्यापेक्षा खरबडीत व त्यावर रेषा-रेषा असतात. तसेच त्याच्या खालच्या बाजूला ते थोडे वाकवलेले स्पष्ट जाणवते. त्याला हलवून पाहिले असता त्यात पाण्यासारखा द्रव असल्याचा आवाज येतो. तसेच त्याचा पापुद्रा थोडा खरबडीत व प्लॅस्टिकचा असल्याचे सहज जाणवते. त्याला फोडले असता त्यात अंड्याच्या काही अंशी पिवळा बलक व काही रसायन असल्याचे जाणवते.
-------------
जळगाव येथे सिंधी कॉलनी भागातील एका दुकानावरून अंड्याचा ट्रे घेतला. त्यामध्ये एक अंडे इतर अंड्यांपेक्षा थोडे वेगळेच असल्याने ते मी बऱ्याच जणांना दाखविले. त्यावेळी ते बनावट असल्याचे समजले.
- डॉ. रमेश पाटील, वडली, ता. जळगाव