जळगाव : तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार ताजा असताना, पुन्हा आता सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या नावाने सुध्दा बनावट खाते तयार करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. वेळीच हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी ते खाते तत्काळ बंद केले आहे. दुसरीकडे इन्स्टाग्रामवर बनावट खाते बनवून एका तरूणीची बदनामी केल्याचाही प्रकार समोर आला आहे.
सध्या गुन्हेगारीचे स्वरूप बदलत चालले असून अगदी कमी श्रम व कमी वेळेत झटपट पैसे कमावण्यासाठी ऑनलाइन, सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या मित्रांकडे पैशांची मागणी करणे तसेच अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करून शेअर करण्याची धमकी देत लाखो रूपये खंडणी स्वरूपात उकळण्याचे नवे उद्योग सुरू झाले आहे. यात आता चोरट्यांनी पोलिसांना देखील टार्गेट केले आहे. काही दिवसांपूर्वी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशांची मागणी केली होती. एका मित्राने तर पन्नास हजार रूपये देखील पाठविले. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. ह्या प्रकाराला काही दिवस उलटत नाही तोच सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांचे सुध्दा फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, वेळीच त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खाते तत्काळ बंद केले. नंतर व्हॉटस्ॲपद्वारे इतरांना सुध्दा घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली व कुणीही पैसे न पाठविण्याचे आवाहन केले व पैशांसाठी जे मोबाईल क्रमांक पाठविले जातील, त्यांची तत्काळ माहिती आपणास देण्याचे आवाहन त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर केले होते.
------------
बनावट खाते तयार केले गेले होते. ओळखीच्या व्यक्तींना त्यावरून संदेश सुध्दा गेले. पण, हा प्रकार लक्षात येताच तत्काळ ते खाते बंद करण्यात आले आहे.
- कुमार चिंथा, सहायक पोलीस अधीक्षक, जळगाव