सायबर पोलिसात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश्वर नगरात राधा (नाव बदललेले) ही तरुणी कुटुंबासह वास्तव्यास आहे. २६ मे ते ३ जून २०२१ दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाचा वापर करून इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. या खात्यावर या तरुणीचा फोटो अपलोड केला. त्यानंतर तरुणीचे इन्स्टाग्रामवरील खाते खरे भासवून तिच्या मित्र व मैत्रिणींशी विचित्र पद्धतीने चॅटिंग सुरू केले. हा प्रकार तरुणीला ३ जून रोजी गुरुवारी दुपारी कळाला. त्यांनी तातडीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७.३० वाजता धाव घेतली. नंतर बनावट खाते तयार करून बदनामी केल्याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.