गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावांत सतत चढउतार होत आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात असलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान तीन दिवस सुवर्णबाजार बंद राहिल्यानंतर सोमवारी (दि. १५) सुवर्णबाजार उघडताच भाववाढीने सुरुवात झाली. त्यानंतर सलग तीन दिवस ही भाववाढ कायम राहत गुरुवारी (दि. १८) सोने ४६ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र शुक्रवारी सोन्याच्या भावात दोनशे २५० रुपयांची घसरण होऊन ते ४५ हजार ९५० रुपये आले. दुसरीकडे, चांदीच्या भावातही सोमवारी ३०० रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर मात्र बुधवारी (दि. १७) चांदीत ३०० रुपयांची घसरण झाली. मात्र गुरुवारी पुन्हा चांदी २०० रुपयांनी वधारली व शुक्रवारी आणखी त्यात १०० रुपयांची भर पडून ती ६८ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.
तसे पाहता गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीमध्ये एकसाथ वाढ होत आहे किंवा एकसाथ घसरण होत आहे. मात्र शुक्रवारी सोन्याच्या भावात घसरण झाली, तर चांदीत वाढ झाली. सट्टाबाजारातील कमी-अधिक खरेदीमुळे असा परिणाम होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.