चाळीसगाव/ मेहुणबारे : कर्जवसुलीच्या खोट्या नोंदी करून पिंपळवाड म्हाळसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सुमारे ५१ लाख २९ हजार ६१२ रुपये ४७ पैशांचा अपहार केल्याचा प्रकार लेखा परीक्षणात उघडकीस आला आहे. कर्जमाफी व कर्जमुक्ती योजनांमध्ये बनावट नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे चेअरमनसह १७ जणांविरुद्ध एकाचवेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथील विविध कार्यकारी सोसायटीत बेकायदेशीररीत्या परस्पर कर्ज वाटप गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून
शासनाने दिलेल्या आदेशानुसार संस्थेचे लेखापरिक्षण मंगेश आरशी वळवी (रा. जळगाव) यांच्यामार्फत करण्यात आले. या तपासणीत विकासो संस्थेत चेअरमन, सचिव आणि संचालक मंडळ यांनी संस्था सभासदांना कर्ज येणे बाकी, निरंकबाबत दाखले दिलेले, बेकायदेशीररीत्या परस्पर कर्ज वाटप दर्शवून रकमेचे चेक व विड्रॉलवर खोट्या व बनावट सह्या करून कर्ज रकमेची स्वत:च्या फायदा संस्थेच्या कर्ज खतावणीला येणे, कर्ज बाक्यांमध्ये खाडाखोड व गिरवागिरव करून प्रत्यक्षात कर्ज वसूल रजिष्ट्रारमध्ये तफावत व चेकच्या खोट्या नोंदी असा एकूण २३ लाख २ हजार ३४२ रुपयांचा अपहार केला असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ आणि महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी व कर्जमुक्ती योजनांमध्ये प्रत्यक्षात वाटप नसलेल्या कर्ज रकमेच्या त्यांना चुकीच्या व खोट्या नोंदी करून बोगस कर्ज वाटप रकमांचा एकूण १६२ सभासदांची सुमारे २७ लाख ५७ हजार ६०९ एवढी शासनाची फसवणूक केली. असा एकूण ५१ लाख २९ हजार ६१२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
तसेच खत दुकानात २ लाख ३३ हजार ४६० रुपयांची अफरातफर केली आहे. त्यानंतर सोसायटीची इमारत बांधकाम तसेच दुरुस्तीचे कामकाज झालेले नसताना खर्चापोटी १ लाख ८ हजार रुपये ही रक्कम दर्शवून ही रक्कम स्वत:साठी वापरून सचिव, अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी संस्थेचा रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी संगनमत करून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत बँक धोरणाच्या असलेल्या नियमांचे पालन न करता संस्थेचे २६ लाख ४३ हजार ८०३ रुपये व शासनाचे २४ लाख ८५ हजार ८०९ रुपये ४७ पैसे असे एकूण ५१ लाख २९ हजार ६१२ रुपये ४७ पैसे या रकमेचा अपहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे.