जळगाव - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबाला जात पंचायतीच्या बाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या घटनेमुळे तळवाडे येथील सरपंचसह 17 जणांवर जातपंचायतीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवाडे येथील शरद उखा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की 25 मार्च 2019 रोजी तळवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा मी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज फकीरा पाटील यांच्या पॅनलला मदत केली म्हणून माझेच नातेवाईक असलेले कौतिक तोताराम पाटील , सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील , मनोहर श्रीराम पाटील , नाना श्रीराम पाटील , राजेंद्र विठ्ठल पाटील , श्रीराम महिपत पाटील , समाधान नाना पाटील , बापू मोतीराम पाटील , छोटू बापू पाटील , किशोर नाना पाटील , अशोक श्रीराम पाटील , नंदलाल कौतिक पाटील , मगन रामदास पाटील, सुदाम अभिमन पाटील , लोटन अभिमन पाटील , हिम्मत अभिमन पाटील , शिवाजी अशोक पाटील , नामदेव कौतीक पाटील सर्व रा तळवाडे यांना राग आल्याने सर्वांनी संमती करून मला जात समूहातून बाहेर काढले व आमच्या व मानवी हक्क व नैसर्गिक तत्वानुसार असलेले सर्व रोटी व बेटी व्यवहार बंद केल्याचा आरोप केला तसेच सामाजिक व आर्थिक पिळवणूक केली शाळा, सामाजिक कार्यक्रम स्मशानभूमी , धार्मिक कार्यक्रम मिरवणूक आदी ठिकाणी सहभागी होण्यास प्रतिबंध केला आरोपींचे समाजविघातक वर्तन कुटुंबाला जीविताला व सामाजिक राहणीमानाला घातक ठरले आहे तसेच इतर लोकांकडून व नातेवाईकांकडून बहिष्कार टाकला नुकताच भाऊबंदकीतील 6 मे रोजी झालेल्या विवाहात व 7 मे रोजी अक्षय्य तृतीयेला शरद पाटील यांना बहिष्कृत केल्याचा अनुभव आला तसेच रामकृष्ण पाटील याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी 17 जंणाविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3, 4, 5 ,6 , 7 प्रमाणे जातपंचायत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.