अमळनेर : घरातील सदस्य गच्चीवर झोपलेले असल्याची संधी साधत चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून रोख रकमेसह अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री गलवाडे रोडवर ताराचंदनगरात घडली.
ताराचंदनगरात कमलेश विजय सोनवणे हा वास्तव्याला आहे. त्याची आई व भाऊ दोन्ही अहमदाबादला गेले होते. घरी तो आणि त्याची मावशी होती. रात्री घराला कुलूप लावून ते गच्चीवर झोपायला गेले. सकाळी उठून खाली आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसून आला. घरात प्रवेश केला असता त्यांच्या लाकडी कपाटातील एक लाख ८० हजार आणि लोखंडी कपाटातील २० हजार रुपये तसेच ३६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटून नेले होते.
कमलेशच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलीस नाईक सुनील हटकर, सुनील पाटील, श्वान पथकातील पोना शेषराव राठोड, विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. घरातील काही वस्तू श्वानाला हुंगवण्यात आल्या. मात्र, चोरट्यांचा मागोवा लागू शकला नाही.