अमळनेर : आधीच पावसाने दडी मारल्याने त्रस्त शेतकऱ्याचे खते घेण्यासाठी सोने गहाण ठेवून काढलेले ५५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १६ रोजी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास अर्बन बँकेजवळ घडली. यातील चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अशोक गोविंदा पाटील (वय ६५, रा. पैलाड) यांची चोपडा तालुक्यातील वेले येथे शेती असून त्यांनी कपाशी लावलेली आहे. अनियमित पावसामुळे उत्पन्न हातचे जाण्याची वेळ आली होती. परवाचा पाऊस पडल्याने उत्पन्न चांगले यावे म्हणून त्यांनी खते लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पैसे नसल्याने पत्नीची मंगलपोत अर्बन बँकेत गहाण ठेवण्यासाठी १६ रोजी सकाळी ११ वाजता बँकेत गेले. प्रक्रिया पूर्ण होऊन पाऊण वाजता ते ५५ हजार घेऊन बँकेबाहेर पडले. पैसे त्यांनी पायजम्याच्या खिशात ठेवले. लघुशंकेसाठी बँके मागील मुतारीत गेले असता एक तिशीतील तरुण मागाहून आला आणि अशोक पाटील यांना कंबरेत एका हाताने धरून दुसऱ्या हाताने खिशात हात घालून बळजबरीने ५५ हजार रुपये हिसकावून नेले आणि बँकेमागील बोळीतून पळून गेला. अशोक पाटील वृद्ध असून गुढघ्याचा त्रास असल्याने प्रतिकार करताना त्यांची ताकद अपूर्ण पडली. बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला आही. अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास सुनील हटकर करीत आहेत.