रिपाइंतर्फे अभिवादन
जळगाव : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. रमाबाई ढिवरे, प्रतिभा भालेराव, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, नरेंद्र मोरे, किरण अडकमोल, प्रताप बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पथदिवे बंद
जळगाव : पावसानंतर शहरातील विविध भागातील पथदिवे बंद असून ते अजूनही सुरू झालेले नाही. यात प्रभात चौक ते मू.जे. महाविद्यालय व पुढे गिरणा टाकी ते थेट वाघ नगर पर्यंत पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
५ रोजी ऑनलाइन लोकशाही दिन
जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
वाहनधारकांची कसरत
जळगाव : अनेक भागात रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कचऱ्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. त्यात सोमवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली असताना बाजारपेठेतून बाहेर पडताना वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यावरून वाहने न्यावी लागली.
स्वच्छतेची मागणी
जळगाव : विविध रस्त्यावर दुभाजक उभारले आहेत. मात्र, या दुभाजकांमध्ये प्रचंड कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या साचल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. झाडांवरही परिणाम होत आहे. दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्ता पुन्हा खड्ड्यात
जळगाव :शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती केलेल्या अयोध्यानगरच्या मुख्य रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीची मागणी होत आहे.