लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. खान्देशासह राज्यातदेखील अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करून, त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची वसुली थांबविण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना, पवारांनी राज्य सरकारकडे दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांबाबत आवाहन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, इंदिरा पाटील आदी उपस्थित होते.
दुष्काळाच्या नियोजनासाठी दिला पंचसूत्री कार्यक्रम
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असून, ठरावीक बाबींकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.१. शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा देण्यात यावा.
२. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पुढे निर्माण होऊ शकतो. त्यावर आतापासूनच लक्ष घालण्यात यावे.३. चाराटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकडे लक्ष देण्यात यावे.
४. जी पिके सद्य:स्थितीत चांगल्या स्थितीत आहेत ती वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज.५. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून, शेतकऱ्यांकडे असलेली वसुली थांबविण्यात यावी, असा पंचसूत्री कार्यक्रमच शरद पवार यांनी मांडला.