लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता ममुराबाद शिवारातील निंबादास चौधरी यांच्या शेतात दादर कापण्याचे काम सुरू असताना, अचानक रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आव्हाने येथील शेतमजूर ठार झाला आहे. या आधीही या भागात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जबर जखमी झाला होता. या परिसरात रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात हौदोस असल्याने शेतकऱ्यांमध्ये वनविभागाचा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या शेतांमध्ये दादर कापणीचे काम सुरू आहे. आव्हाणे येथील ममुराबाद शिवारात निंबादास चौधरी यांच्या शेतातही दादर कापणीचे काम सुरू होते. यावेळी सात ते आठ मजूर हे काम करत असताना, अचानक रानडुकराने कैलास उत्तम भिल (वय ३७) या शेतमजुरावर हल्ला केला. या शेतातच काम करणाऱ्या काही मजुरांनी रानडुकराला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्रे, रानडुक्कर अधिक आक्रमक झाला. यामध्ये या डुकराने कैलास भिल यांच्या मांडीवर व गुप्तांगावर चावा घेतला. हा हल्ला इतका जबर होता की, कैलास भील हे जागीच ठार झाले, तसेच या हल्ल्यामुळे बाकीचे शेतमजूरही भीतीने हा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. हल्ला करून रानडुक्कर दादरच्या शेतात पसार झाले. घटनेची माहिती मिळताच, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विलास नारायण चौधरी (किटू नाना) यांनी याबाबत वनविभागाला घटनेची माहिती दिली. कैलास भील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्या ठिकाणी वनविभागाचे प्रादेशिक अधिकारी आर.जी.राणे यांनी कैलास भील यांच्या शरीरावर झालेल्या जखमांवरून हा हल्ला रानडुकराने केलेला असल्याची पुष्टी केली. कैलास भील यांच्यापश्चात पत्नी वंदना भील आणि आरती, दिव्या व गोविंदा अशी तीन मुलं आहेत. कैलास भील हे सर्वसामान्य मजूर कुटुंबातील होते, तसेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही त्यांच्या मजुरीवर चालत होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत वनविभागाला सूचना देऊन शेतमजुराला नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने, याबाबत बंदोबस्त करण्याचा सूचनाही वनविभागाला दिल्या आहेत.