गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : शेताच्या बांधावरील निरूपयोगी गवत कापताना डाव्या पायाला सर्पदंश झाल्याने येथील शेतकरी प्रकाश शिवराम सोनवणे (पाटील) (वय ६०) यांचा सोमवारी दुपारी बाराला मृत्यू झाला.शेतकरी प्रकाश शिवराम पाटील हे शेतात सकाळी १० वाजता बहाळ रस्त्यालगत शेतात गेले होते. जास्त पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात बांधावर गवत वाढले होते. म्हणून ते गवत कापत होते. गवत कापताना त्यांच्या डाव्या पायाला काहीतरी चावले म्हणून ते घाबरले. आजुबाजुला पाहिले असता त्यांना जवळपासच सर्प जाताना दिसला. त्यांनी शेतातील दुसºया बाजूला काम करीत असलेला मुलगा व पत्नी यांना जोरजोरात आवाज दिला. त्यांनी त्यांंना सर्प दंश झाल्याचे सांगितले. ते सर्व घाबरले. इकडे तिकडे इतरांना मदतीला बोलवले. पण आजुबाजुला कोणीही दिसत नसल्याने मुलगा रस्त्याकडे आला. कोणी मदतीला येते का, पण कोणीही दिसत नसल्याने त्यांनी त्या अवस्थेत खांद्यावर उचलून पुन्हा रस्त्यावर आणले. एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीने घरी आणले. गावातील खाजगी डॉक्टराना दाखवले. त्यांनी तत्काळ भडगावला पुढील उपचारासाठी घेऊन गेले. ते तोपर्यंत बेशुद्ध झालेले होते. ग्रामीण रुग्णालयात पोहचले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुढे येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 9:05 PM