जळगाव/नाशिक/अहमदनगर : कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करत निर्यात मूल्यही हटविल्याने कांद्याच्या भावात शनिवारी वाढ झाली. त्याचबरोबर सोयाबीनची ९० दिवस हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलोमागे २२ ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. लवकरच सोयाबीनच्या भावातही वाढ होऊ शकते.
कांद्याला उच्चांकी भाव
कांद्याच्या दरात शनिवारी सरासरी ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये शनिवारी उच्च प्रतीच्या गावरान कांद्याला क्विंटलला तब्बल ५५०० रुपये उच्चांकी भाव मिळाला.
साेयाबीनही वधारणार !
केंद्र सरकारने रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के एवढे केले आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या भावात थोडी वाढ हाेणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
कच्च्या खाद्यतेलावर याआधी ५.५ टक्के एवढे आयात शुल्क होते. आता ते २७.५ टक्के एवढे करण्यात आले आहे, तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क पूर्वीच्या १३.७५ टक्क्यांवरून आता ३५.७५ टक्के एवढे करण्यात आले आहे.