रिक्षाच्या जुन्या इंजीनपासून बनविले शेती अवजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 1:04 PM
बैलजोडीचे गडीमाणसासह भाडे दिवसाला १५०० रुपये आहे. त्यात ऐन हंगामात बैलजोडी भाड्याने मिळणेही मुश्कील होते
आॅनलाईन लोकमत / समाधान निकुंभदापोरा, जि. जळगाव, दि. १२ - येथील मूळ रहिवासी असलेल्या सध्या शिरसोलीत वास्तव्यास असलेल्या किरण व भूषण काळे या भावंडांनी रिक्षाच्या जुन्या इंजिनपासून अवघ्या पाच हजार रुपये खर्चात वखरणी, कोळपणी व नांगरणी करणारे शेती अवजार बनविण्यात यश मिळविले आहे.दापोरा तसेच शिरसोलीतील शेतकरी उत्सुकतेपोटी हे यंत्र पाहण्यासाठी येत आहेत.काळे कुटुंबीयांची दापोरा येथे अडीच एकर शेती असून ते सध्या शिरसोलीत वास्तव्यास आहेत. आई-वडील, दोघे भाऊ व त्यांचे कुटुंब आहे. त्यापैकी किरण हा जळगावात एका व्यावसायिकाकडे डिझेल पंप मेकॅनिक म्हणून काम करतो. तर दुसरा भाऊ भूषण हा शिरसोली ते दापोरा दरम्यान रिक्षा चालवितो. तसेच दोघे भाऊ आपला कामधंदा सांभाळून शेतीही करतात. मात्र शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. साधी वखरणी करायची तर बैलजोडीचे गडीमाणसासह भाडे दिवसाला १५०० रुपये आहे. त्यात ऐन हंगामात बैलजोडी भाड्याने मिळणेही मुश्कील होते. त्यामुळे कमी खर्चात यावर काही तोडगा काढता येईल का? यावर दोघा भावंडांचा विचार सुरू झाला. घरी रिक्षाचे जुने इंजिन पडलेले होते. त्याचा वापर करीत ५० किलो लोखंडी अँगल वापरून व वेल्डिंग करून शेतीतील नांगरणी, वखरणी, कोळपणी आदी कामे करू शकेल असे यंत्र बनविण्यात यश मिळविले. वेल्डर सचिन देवरे यांनीदेखील त्यांना त्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे या यंत्रासाठीचे इंजिन घरचेच असल्याने अवघा ५ हजार रुपये खर्च त्यासाठी आला. तीन लीटर पेट्रोलमध्ये अडीच एकरअडीच एकर शेतीची कोळपणी बैलजोडीच्या साहाय्याने करायचे ठरविल्यास संपूर्ण दिवस लागतो. तसेच त्यासाठी सुमारे १५०० रुपये भाडे लागते. मात्र या यंत्राच्या साहाय्याने अवघ्या तीन लीटर पेट्रोलमध्ये म्हणजे सुमारे २५० रुपये खर्चातच हे काम दिवसभरात करण्यात या भावंडांना यश आले. त्यामुळे त्यांना आता दुसºयावर विसंबून रहावे लागणार नाही. याची माहिती मिळताच दापोरा तसेच शिरसोलीतील शेतकरी उत्सुकतेपोटी हे यंत्र पाहण्यासाठी येत आहेत.