यावल, जि.जळगाव : तालुक्यातील मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या ७७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने नापिकी व कर्जफेड होत नसल्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठला उघडकीस आली.मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या शेतकºयाकडे सेंट्रल बँकेचे दोन लाख ९० हजार रुपये कर्ज आहे. त्यातच गेल्या दोन तीन वर्षापासून नापिकी होत आहे. केळीची बाग आहे, मात्र व्यापाऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे केळीला भाव मिळत नाही. व्यापारी मनमानी भावाने केळी खरेदी करतात. त्यातच सध्या मार्चअखेर असल्याने कर्जाचा बँकेचा हप्ता कसा भारावा या चिंतेत असलेल्या सुरेश भागवत पाटील यांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सुरेश पाटील नेहमीप्रमाणे पिळोदा शिवारातील त्यांच्या मालकीच्या गट नंबर ४४ /१ या शेतात गेले होते. शनिवारी रात्री ते घरी परतलेच नाहीत म्हणून रविवारी सकाळी कुटुंबियांनी शेतात जावून पाहिले असता त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाशेजारी विषाच्या बाटल्या आढळून आल्या. त्यांचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला.यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ.शुभम जगताप यांनी केले. पाटील यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी मनवेलचे पं.स. सदस्य दीपक पाटील, माजी पं. स. सदस्य अरूण पाटील, अनिल श्रावण पाटील, वढोदा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप प्रभाकर सोनवणे व नातेवाईक उपस्थित होते. मयत सुरेश पाटील यांचे पुतणे नंदकिशोर पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल युनुस तडवी करीत आहेत.
यावल तालुक्यात कर्ज व नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 7:14 PM
यावल तालुक्यातील मनवेल येथील सुरेश भागवत पाटील या ७७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने नापिकी व कर्जफेड होत नसल्याने आत्महत्या केली.
ठळक मुद्देमनवेल येथील घटनाशेतातच विष घेतल्याचे निष्पन्नमृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश