आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१७ : तालुक्यातील येथील ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४८, रा.शिरसोली प्र.बो.) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. पाटील यांच्यावर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व शेतीचे कर्ज होते.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाटील यांची पत्नी कल्पनाबाई सकाळी प्रांतविधीसाठी गेलेल्या होत्या तर मुलगा विजय व मुलगी दीपाली हे लग्नाच्या निमित्ताने ममुराबाद येथे मामाकडे गेले होते त्यामुळे ते घरी एकटेच होते. ही संधी पाहून त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. पत्नी परत आली तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केली. नातेवाईक व पोलीस पाटील शरद पाटील यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपास भरत लिंगायत करीत आहेत.
दरम्यान, पाटील यांच्यावर विकासोचे ४० हजार तर खासगी सावकाराचे काही कर्ज होते. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे.पाटील यांच्या पश्चात पत्नी कल्पना, विवाहित मुलगी दीपाली, दामिनी व मुलगा विजय असा परिवार आहे. मुलगा दहावीला असून मामाकडे शिक्षण घेतो. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.