जळगाव : रस्त्यावर असलेल्या मुरूम व दगडांच्या ढिगावर दुचाकी आदळल्यानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शेतक-यांचा मृत्यू झाल्याची घटना जळके-वावडदा रस्त्यावर बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर नामदेव पाटील (४५, रा़ जळके, ता़ जळगाव) असे मयत शेतक-याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळके येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील हे बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच.१९.बीएच.७५३९) ने जळके येथून वावडदा येथे काही कामाच्या निमित्ताने निघाले होते. जळके आणि वावडदा दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे रस्त्यावर मुरूम व दगडाचे ढिग आहेत. अंधारात मुरूम आणि दगडाचे ढिग दिसून न आल्यामुळे त्यांची दुचाकी ढिगावर आदळली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळके गावातील तरूण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले़ मात्र, तपासणीअंती पाटील यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.