जामनेर : चाळीसगाव व जामनेर तालुक्यातील शेतीच्या नुकसान संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. पुनर्वसन मंत्र्यांनी पंचनाम्यात वेळ न घालविता तत्काळ मदतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पीक विमा नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाइन होण्यात तांत्रिक अडचण येत असल्याने ऑफलाइन स्वीकारले जातील. याबरोबरच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत देण्यास बांधील असल्याचे पाटील यांनी आश्वासन दिले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी शुक्रवारी सकाळी तालुक्यातील ओझर बुद्रूक, ओझर खुर्द व हिंगणे न क येथील नुकसानग्रस्त शेतातील पिकांची पाहणी केली. पीक विम्यासाठी वणवण भटकणाऱ्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसमोर संताप व्यक्त केला.
पाळधी (ता.धरणगाव) येथून जामनेरला आलेल्या पालकमंत्री पाटील यांनी सुरुवातीला आमदार महाजन यांचे निवासस्थानी भेट घेत चहापान व नाश्ता केला. येथून निघताना पालकमंत्री पाटील यांनी त्यांच्या गाडीत उजव्या बाजूला गिरीश महाजन व डाव्या बाजूला संजय गरुड यांना व पुढील सीटवर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ मनोहर पाटील यांना बसविले.
गावाला लागून असलेल्या व नुकसान झालेल्या शेतातील कापूस व केळीची पाहणी नेत्यांनी केळी. चक्री वादळाने ओझर खुर्द गावातील नुकसान झालेल्या घरांची धावती पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन मंत्री पाटील यांनी स्वीकारले.
पालकमंत्री असल्याने पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार व माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना व घटक पक्षातील नेत्यांना सोबत घेतले. नुकसान झालेले शेतकरी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी मध्य प्रतिनिधींशी बोलताना दिली.
-------------------------------------------------
आणि शेतकरी संतापले...
हिंगणे न क येथील एका शेतात केळीची पाहणी केल्यानंतर टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री पाटील यांना मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता उपस्थित शेतकरी संतापले. नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचा जीव जात असताना राजकारणावर का बोलता, आमच्या मदतीबद्दल काय ते सांगा. असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला.
-------------------------------------------------
हा प्रसंग राजकारण करण्याचा नाही. शेतकऱ्यांचे दुःख आहे. सर्व मिळून त्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.
-------------------------------------------------
यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी, घरांचे नुकसान झालेले ग्रामस्थ, शिवसेनेचे डॉ. मनोहर पाटील, सुधाकर सराफ, विश्वजित पाटील, नीळकंठ पाटील, अतुल सोनवणे, भरत पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, शंकर राजपूत, मूलचंद नाईक, राष्ट्रवादीचे भगवान पाटील, पप्पू पाटील, विनोद माळी, तहसीलदार अरुण शेवाळे, बीडीओ जे. वी. कवडदेवी आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
ओझर बुद्रूक (ता.जामनेर) येथील कापूस व केळीच्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन, संजय गरुड आदी.११/३