वाघडू, ता. चाळीसगाव : एकीकडे पावसाची अनियमता आणि त्यातच शेतशिवारात रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी वर्ग वैतागला आहे.
वाघडूसह वाकडी रोकडे, रोकडे तांडा, बाणगाव, रांजणगाव परिसरातील शेतशिवारात रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी अतिशय वैतागला असून त्यांना बंदिस्त करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी विविध शक्कल लढवली. मात्र हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी शेवटी यांचा नादच सोडला. सध्या खरीप हंगामातील नाजूक पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असताना रानडुक्कर उभ्या पिकाचे नुकसान करून नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवावर आले आहे..
आठ, दहा रानडुक्कर प्राण्यांचा कळप असतो. शेतातील पिकांचा नाश करीत असतात. सध्या सर्व शेतशिवार खरीप हंगामाच्या पिकांनी व्यापल्याने रानडुक्कर नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याने शेतकरीवर्ग त्याला बंदिस्त करण्यासाठी शेतीची कामे बाजूला ठेवून त्यांचा पाठलाग करीत आहेत. दुसरीकडे पीक नुकसानीने शेतकरी वैतागला असून याची संबंधित वनविभागाने दखल घेऊन त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.