नशिराबाद परिसरात मुर्दापूर धरणाच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र जमिनीत ओल नसल्याने रब्बीची दुबार पेरणीचे संकट समोर ठाकले होते. याबाबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मुर्दापूर धरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याबाबत धरण विभागाने दखल घेऊन पाणी सोडण्याबाबत हिरवा कंदील दर्शविला. अखेर बुधवारी पाणी आवर्तन सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. धरणातून आवर्तन सुटल्यामुळे नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धरणातून पाणी सुटणार या उद्देशाने मुर्दापूर धरण्याच्या कॅनाॅलची जेसीपीद्वारे पोकलेनद्वारा दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर लागलीच कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी दिली.