मुंबई/जळगाव - केंद्रात व राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांच्या हिताचे नाही. काँग्रेसचे सरकार असताना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ, डालडा, तेल, साखर मिळत होते पण भाजपाच्या राज्यात रेशनवर धान्यच मिळत नाही. देशात गरीब लोक राहिले नाहीत असे केंद्र सरकार म्हणत आहे. मोदी सरकारने गरीब कुटुंबाला उज्ज्वला गॅस दिला आणि केरोसिन बंद केले, सरकारच्यामते ज्यांच्या घरी गॅस सिलिंडर आहे तो गरीब नाही आणि या लोकांना रेशनवरील डाळ, तेल, साखर, तांदूळ सर्व बंद करुन टाकले. शेतकऱ्यांच्या शेतात डाळ पिकते त्यावेळी डाळीला भाव नसतो आणि तीच डाळ अदानींच्या गोडाऊनमध्ये गेली की १७० रुपये किलो होते, असेही पटोले यांनी म्हटले.
जनसंवाद यात्रेच्या आजच्या १० व्या दिवशी नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरातील पदयात्रेत सहभाग घेतला व दुपारी सभा घेतली. त्यानंतर झेंडा चौक, सेंदुरवाफा येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली व संध्याकाळी जुनी पंचायत समिती परिसर, साकोली येथील जाहीर सभेला संबोधित केले.
जनसंवाद यात्रेतील सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी, व्यापारीविरोधी, गरिबांच्याविरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या शेतात डाळ पिकते त्यावेळी डाळीला भाव नसतो आणि तीच डाळ अदानीच्या गोडाऊनमध्ये गेली की १७० रुपये किलो होते. दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करा त्यावर आपल्याला जीएसटी द्यावा लागतो. राज्यातील हिटलर सरकार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नाही तर कनेक्शन तोडते. उन्हाळी धानाचे पैसे अजून मिळाले नाहीत. आठ दिवसात पैसे देण्याचा नियम आहे पण सरकारने शेतकऱ्यांचा तीन-चार महिने दैसे दिले नाहीत. गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, त्याचा उपयोग काय? खतांच्या किमती दुप्पट केल्या व खतांचे पोते ५० किलोऐवजी ४५ किलोचे केले. खतांची लिंकिग करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. शेतीला लागणारा टॅक्टर घ्यायचा असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो आणि कार खरेदी करायची असेल १२ टक्के जीएसटी द्यावा लागतो. भाजपा सरकार आल्यापासून देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, गृहिणींच्या आत्महत्या वाढल्या आहेत, तरुणांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपाच्या राज्यात मरण स्वस्त झाले आहे, लोकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करु नये, काँग्रेस तुमच्यासोबत आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे दुःख, वेदना, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. जनसंवाद यात्रा खुर्चीच्या लढाईसाठी नाही तर लोकशाही, संविधान व देश वाचवण्याची लढाई आहे, ही लढाई आपण मिळून लढू व देश, लोकशाही व संविधान वाचवू, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.