शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्यानंतर जिल्हा बँक तथा राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम कापून विमा कंपनीला जमा करीत असतात. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबू नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा दिला आहे. यात पेरणीनंतर ७२ तासात पाऊस पडला नाही अथवा हवामानामुळे पिके आली नाहीत तरी शेतकऱ्यांना विमा मंजूर होतो. यावर्षी ९ जुलै उजाडला पहिल्या पावसाव्यतिरिक्त पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे बियाणे वाया गेले आहेत. विम्याचा लाभ मिळावा यासाठी सुभाष पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत पीक विम्याचा हप्ता शेतकऱ्यांच्या नावाने विमा कंपनीला जमा झालेले नसल्याने विमा नोंद ग्राह्य धरली जात नसल्याने लाभ देता येणार नाही असे सांगण्यात आले. गेल्यावर्षी बँकांनी २४ जुलै रोजी विमा हप्ता विमा कंपनीला भरला होता यावर्षी १५ जुलैला भरण्यात येणार असल्याने त्यानंतर विमा लाभ मिळण्यास शेतकरी पात्र होतील. मार्च, एप्रिलपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाते आणि मेअखेर जूनपासून पेरण्या सुरू होतात त्यामुळे वेळीच जर विमा हप्ते भरले गेले तर बँकांच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही अशीही मागणी सुभाष पाटील यांनी केली आहे.
बँकांचे नियोजन चुकल्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:12 AM