चाळीसगाव : देशभरातील ३६ विभागांमधील हवामानाचा वेध घेऊन यावर्षी सरासरी १०१ टक्के पावसाच्या ‘गुड न्यूज’चा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, आभाळ बरसल्याशिवाय शेतात पेरा करायचा तरी कसा? अशा द्विधा स्थितीत शेतकरी आहे. बाजारात बियाणे उपलब्ध झाले असून, विक्री मात्र संथ गतीनेच होत आहे. बियाणांच्या दरांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत १० ते १५ टक्के दरवाढ झाली आहे. मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला मात्र वेग आला आहे. दि. ८ पासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे.
परिसरात गत आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने सलामी दिल्यानंतर खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. धूळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याने काही प्रमाणात बागायती कपाशीचा पेरा करण्यात आला. कृषी विभागाने मात्र १ जूननंतरच मान्सूनपूर्व कपाशी लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. नियमित पावसाचे आगमन काहीसे उशिरा होण्याचे संकेत मिळाल्याने लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये काहीअंशी संभ्रम आहे. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस बरसल्याशिवाय पेरण्यांना वेग येण्याची शक्यता कमी आहे.
...........
चौकट
दुकानांमधूनच घ्यावी लागणार बियाणे व खते
शेतकऱ्यांच्या बांधावरच खते व बियाणे पोहोचविण्याचे कृषी विभागाचे नियोजन असले तरी, शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांनी दुकानदारांकडून बियाणे व खते विकत घेऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची ही योजना आहे. या प्रक्रियेत अडचणी अधिक असल्याने शेतकऱ्यांना थेट कृषी साहित्य विक्री दुकानातूनच बियाणे व खते घ्यावी लागणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बियाणे व खतांची चौकशी करण्यासाठी शेतकरी दुकानांवर येत आहेत, अशी माहिती गणेश व्यापारी संकुलातील कृषी साहित्य विक्रेते अनिल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
.....
चौकट
बाजारात कपाशीची ७० वाणे उपलब्ध
चाळीसगाव तालुक्यात ९० हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निर्धारित केले आहे. यात २६ हजार बागायती, तर ३४ हजार ४३७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा होणे अपेक्षित आहे. कृषी बाजारात कपाशी बियाणांची ७० वाणे उपलब्ध आहेत. तालुक्यासाठी दोन लाख ८७ हजार ८५० बियाणे पाकीट लागणार असून, २८ हजार मेट्रिक टन खताची मागणी असणार आहे.
बाजारात उपलब्ध असलेले पीकनिहाय बियाणे व प्रतिपाकीट भाव असा-
पीक वाण प्रकार भाव
कपाशी ७० ७३०
मका १५ १०० ते १९०
ज्वारी १० ४५० ते ६००
बाजरी १० ३०० ते ५८०
.............
चौकट
पावसाचे आगमन लांबणार
सद्य:स्थितीत केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. अंदमानात पोहोचलेला मान्सून केरळात पोहोचल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक पाऊसमान, वाऱ्याची दिशा हे निकष अजून पूर्ण झालेले नाहीत. यंदा मान्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे आज ३ जून रोजी येण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाच्या पुढील वाटचालीचे वेळापत्रक काहीसे लांबण्याची शक्यता आहे. ८ पासून मृग नक्षत्र सुरू होत असले तरी, पेरणीचे गणित दमदार पावसावरच अवलंबून असते. पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे एकवटले आहेत.
१) गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक ११७ टक्के पर्जन्यमान झाल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे. तालुक्यात ७५० मि.मी. पाऊस झाल्यास पर्जन्यमानाची सरासरी पूर्ण होते.
२) गतवर्षी आभाळमाया भरभरून बरसल्याने १४ मध्यम प्रकल्पांसह मन्याड व गिरणा धरण ओसंडून वाहले. याचा फायदा खरिपासह रब्बी हंगामाला झाला. तथापि, कोरोना व टाळेबंदीमुळे शेती व्यवसायासमोरील अडचणीही वाढल्या.
३) यावर्षी मार्च महिन्यात २० ते २४, असे सलग पाच दिवस अवकाळी धूमशान व गारपीट झाल्याने रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले.
.......
इन्फो
शेतकऱ्यांनी पाऊस सक्रिय झाल्याशिवाय पेरणी करणे योग्य नाही. मान्सूनपूर्व कपाशी लागवडही १ जूननंतरच करावी. बियाणे व खते विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित केले आहे. भरारी पथकेही सक्रिय केली जाणार आहेत.
-सी.डी. साठे,
तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव