देशात शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत राज्य अग्रेसर आहे़ या पार्श्वभूमीवर आपण कृषी दिन साजरा करीत आहोत याचे दु:ख होत आहे. ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कृषी दिन साजरा करण्यात येतो ते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांच्या काळात शेतकरी राजा होता व आज तो ‘दीन’ (गरीब)का झाला याचे विचारमंथन होणे गरजेचे आहे़ गेल्या ४०-४५वर्षाआधीचे शेतमालाचे भाव उदा:- कापूस- रूपये ३०० प्रती क्विंटल, ऊस - रूपये २६० प्रतिटन, व त्याकाळी सोन्याचा भाव:- रूपये ३००प्रती तोळा (त्याकाळचं १२ग्रॅम) असा होता. आज सोने आहे रूपये ३५००० प्रती तोळा(१०ग्रॅम) म्हणजे ११६पट वाढ झाली व कापूस आहे रूपये ५०००प्रति क्विंटल फक्त १६पट वाढ व ऊस रूपये २१००प्रतिटन म्हणजे ८ पट वाढ. याचाच अर्थ ज्यावर जगाची अर्थव्यवस्था आहे त्या सोन्याचे भाव शेतमालाच्या भावापेक्षा १००पट जास्त वाढले हा फरक़ तुलनेत शेती चा उत्पादन खर्च हा कसा वाढला ते बघणे देखील महत्वाचे आहे. त्या काळी रासायनिक खतांची थैली ५-७ रूपयांना मिळायची. मजुरी दर रूपये १-२प्रती दिन तर विजेचे दर नाममात्र, वाहतूक एस टी चे भाडं ५पैसे प्रती किमी होता. आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च हा किमान १००पट वाढला. याचाच अर्थ शेतमालाचा उत्पादन खर्च हा सोन्याच्या किंवा जगाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे किमान १००पट वाढला व शेतमालाचे बाजारभाव फक्त १५ते २० पटच वाढले म्हणजे ८०पट तूट व तेवढा तोटा दरवर्षी वाढत गेला व त्यानेच शेतीचे अर्थशास्त्र बिघडले. वाढते कर्ज व या जीवनाच्या चक्रव्यूह मध्ये अडकलेले शेतकऱ्याच्या डोक्यात आपसूकच आत्महत्येचा विचार येतात.- एस. बी. पाटील , सदस्य, सुकाणू समिती़
राज्यातील शेतकरी दीन का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:02 PM