लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : आशिया महामार्ग क्रमांक ४६च्या चौपदरीकरण कामात जमिनी गेलेल्या ५२ शेतकऱ्यांना अजूनही मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले. या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर चौपदरीकरणाचे काम पुढे सुरू झाले.
दिनांक १० रोजी सकाळी १० वाजता तालुका कृषी कार्यालयापासून वळण घेत नव्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान पारोळा शहरातील ५२ शेतकऱ्यांची शेतजमीन महामार्ग विभागाने भूसंपादित केली आहे. यात शेतकऱ्यांना मोबदल्याची मंजूर रक्कम मिळाली नाही आणि जी रक्कम दिली, ती देताना या भागातील शेतकऱ्यांवर दराच्या बाबतीत अन्याय झाला असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग आम्हाला भूसंपादनाचा मंजूर पैसा मिळावा, अशी मागणी करीत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना उर्वरित भूसंपादनाचा मोबदला देण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.आम्हाला मंजूर मोबदला मिळत नाही, तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत या शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. शेतकरी कुटुंबासह चौपदरीकरणाचे काम ज्या ठिकाणी चालू होते, त्या ठिकाणी येऊन मशिनरीसमोर माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पडल्याचे समजताच तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, महामार्ग विभागाचे शक्ती सिंग, देवेंद्र मिश्रा आदी नियंत्रण पथक व सर्व लवाजम्यासह घटनास्थळी दाखल झाले.
तहसीलदार अनिल गवांदे यांनी घटनास्थळी येत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी मोबाइलवरून वार्तालाप केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या अपिलावर चर्चा होऊन ते मान्य करीत त्यांना मंजूर मोबदला देण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. तहसीलदार अनिल गवांदे यांनी १५ ते २० दिवसांत भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मंजूर मोबदला मिळणार आहे, असे सांगितले; पण यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या खात्यावर मोबदल्याचे पैसे जमा होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवा, अशी मागणी केली; पण चालू काम बंद ठेवता येणार नाही, असे ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगितले; पण शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने मग सर्व शेतकऱ्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून महिला-पुरुष अशा सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यावेळी शेतकरी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, दिलीप वाणी, ज्ञानेश्वर पाटील, उमेश पाटील, संदेश वाणी, सुनील शहा, अशोक पाटील, नाना पाटील, संजय पाटील या शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागूल, पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, नाना पवार, सुनील पवार यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाची दिशा ठरणार, तोपर्यंत काम बंदपारोळा शहरा लगत तालुका कृषी कार्यलया जवळ वळणावर आशिया महामार्ग ४६ चे महामार्ग चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.या महामार्ग मध्ये शहरातील ५२ शेतकऱ्यांची शेती संपादित करण्यात आली आहे.परन्तु शेतीचा मंजूर मोबदला या शेतकऱ्यांना न मिळाल्याने त्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. पोलिसांनी त्या सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रमुख गोविंद शिरोळे यांच्यासह सर्व शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अमळनेर उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार अनिल गवांदे व राष्ट्रीय महामार्ग विभागाची टीम आली होती. या चर्चेतून दुपारी ३ वाजेपर्यंत तोडगा निघाला नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस जिल्हा अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे आले असता आंदोलनकर्ते व पोलीस अधीक्षक यांच्यात चर्चा झाली. त्यांच्या सांगण्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली व आंदोलनकर्त्यांनी उद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेऊन निर्णय होईल, तो निर्णय होईपर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बंद ठेवावे, असे सांगितले शेतकऱ्यांची शेती गेली आहे, मागणी योग्य आहे पण पद्धत चुकीची आहे. कायदा हातात घेऊ नका. योग्य पद्धतीने कामे करा. योग्य पद्धतीने कार्यालयीन पाठपुरावा करून काम बंद करा, पद्धत चुकीची असल्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागते, असे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हेही उपस्थित होते