(डमी १०३५)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक पुर्णपणे वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली असून, जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीमध्ये तब्बल २० हजार हेक्टरची घट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात ज्वारीची पेरणी होत असते, मात्र यावर्षी केवळ २५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना देखील ज्वारी विकत घेवून खावी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गेल्या काही वर्षात बाजारात ज्वारीची मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या एकूण लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात ज्वारीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. जून महिन्यात पाऊस वेळेवर न झाल्याने पहिल्यांदा केलेली पेरणी वाया गेली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या वेळेस उडीद, मूग, बाजरीला प्राधान्य दिले आहे.
असा घटला ज्वारीचा पेरा
२०१७ - ४१ हजार हेक्टर
२०१८ - ३९ हजार हेक्टर
२०१९ - ३७ हजार हेक्टर
२०२० - ३४ हजार हेक्टर
२०२१ - २५ हजार हेक्टर
यंदा कोणत्या पीकाचा किती पेरा
ज्वारी - २४ हजार ६२०
सोयाबीन - १७ हजार २२२
उडीद - २२ हजार २००
मूग - २३ हजार ९०३
बाजरी - ६ हजार ५४५
शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक
खरीप हंगाम पुर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यात ज्वारीसारखे पीक हे कमी किंवा जास्त पावसात खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्वारी पेक्षा उडीद, मूग व सोयाबीन हे पीके फायद्याची ठरतात. त्यात उडीद व मूगाला बाजारात चांगला भाव असून, तीन महिन्यात हे पीक येते.
-जनार्दन चौधरी, शेतकरी
ज्वारीला चांगला भावदेखील भेटत नाही, त्यात ऐन काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडते. त्यामुळे ज्वारीला भाव मिळणे कठीण होवून जाते. त्या तुलनेत उडीद व मूग थोडे खराब झाले तरी भाव मात्र शेतकऱ्यांना परवडणाराच असतो.
- विजय पाटील, शेतकरी
का फिरवली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ ?
जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारीची लागवड फारशी होत नाही. त्यात जिल्ह्यात पावसाळ्यानंतर चाऱ्याचीही चणचण भासत नाही. त्यात पावसामुळे ज्वारी खराब होण्याचीही शक्यता अधिक असते. त्यामुळे खरीप पेक्षा रब्बी हंगामात ज्वारीची लागवड अधिक होते.
-दीपक जाधव, शेतकरी