लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तापी आणि पूर्णा खोऱ्यात झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मदतीची मागणी केली. त्यात शेतकऱ्यांना पालघरच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केली आहे. त्याबाबतचे शासन निर्देश जारी केले जाणार आहेत.
रावेर, मुक्ताईनगर आणि चोपडा या तालुक्यांना या वादळी वारे आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यात २३७ गावांचे नुकसान झाले आहे. ४५१७ शेतकऱ्यांच्या ३७०९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच संबधिंत यंत्रणांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले होते. त्याबाबत मंत्री मंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याबाबतचे निर्देश लवकरच जारी केले जाणार आहेत. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत गुलाबराव पाटील यांनी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांमधील १३ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मांडला. यात मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोदे, बेलसवाडी, बेलखेडे, भोकणी धामंदे, पातोंडी, पिंप्रीनांदू व अंतुर्ली ८ गावे तर रावेर तालुक्यातील सुलवाडी, भामलवाडी, मांगलवाडी, ऐनपूर, सोनबर्डी तांदलवाडी अशा १३ गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक विचार करण्यात येऊन लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.